सुधीर गोखले
सांगली : सांगली जिल्ह्यातील शेती संपदा ज्या कृष्णा आणि वारणा नदीवर अवलंबून आहे या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये उन्हाळ्यामुळे प्रचंड घट झाली असून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे अयोग्य नियोजनामुळे कृष्णा काठच्या पिकांचे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. टेम्भू ताकारी म्हैसाळ योजनेमधून दुष्काळी भागाला पाणीपुरवठा होत आहे.
कृष्णा नदीतील पाणी पातळी घटून नदीमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे मिरज पलूस आणि वाळवा या तालुक्यामधील उपसा सिंचन योजना ठप्प आहेत. त्यामुळे कृष्णा नदीमध्ये कोयना धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्याची मागणी या भागातील शेतकरी वर्गाकडून आणि नागरिकांकडून होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून भिलवडी ते हरिपूर पर्यंत नदीच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतीसाठी असलेल्या उपसा जलसिंचन योजनाचे पंप बंद ठेवावे लागत आहे. परिणामी तीव्र उन्हामुळे पिकांचे नुकसान होत असून शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.
त्यात जिल्ह्यातील नेतेमंडळी राजकारणामध्ये व्यस्त असून शेतकरी मात्र त्रस्त असल्याचे सर्वत्र चित्र आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी वेळकाढूपणा करत असून सतत तक्रारी केल्यानंतर कोयने मधून दोन हजार क्युसेक्स पाणी सोडले गेले आहे. सध्या टेम्भू आणि ताकारी योजनेचे वीस पंप सुरु आहेत. त्यामुळे हरिपूर भिलवडी पर्यंत कमी पाणी नदीपात्रात येत आहे पर्यायाने कृष्णा नदीपात्रात पाणीसाठा कमी प्रमाणात होत आहे त्यामुळे कोयनेतून आणखी पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे.
जलसंपदा विभागाने कोयनेतून अतिरिक्त पाणी सोडावे अन्यथा जलसंपदा विभागाच्या वारणाली (विश्रामबाग) येथील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.