दौंड मधील दुकानदाराची लाखोंची फसवणूक, पोलिसाच्या पत्नीवर गुन्हा दाखल

अख्तर काझी

दौंड : मी पोलीस खात्यात कामाला असल्याने मी माझ्या नावाने नाही तर माझ्या पत्नीच्या नावाने साईट (बांधकाम प्रकल्प) चालू करीत आहे, यामध्ये तू तुझ्या व्यवसायासाठी गाळा (दुकान) बुक कर असे मित्राला सांगून त्याच्याकडून जवळपास तब्बल 10 लाख रुपये घेऊन त्याला गाळा न देता त्याची फसवणूक केली असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी औषध दुकानदार सचिन रघुनाथ गायखे (रा.साखरे गॅरेज समोर गोपाळवाडी , दौंड) यांनी फिर्याद दिली असून दिपाली रामदास जाधव (रा.स्वप्नदीप अपार्टमेंट ,गोपाळवाडी रोड, दौंड) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व रामदास लक्ष्मण जाधव यांची मैत्री आहे. फिर्यादी यांना व्यवसायासाठी गाळा (दुकान) हवे असल्याची चर्चा त्यांनी त्यांचे मित्र रामदास जाधव यांच्याबरोबर केली होती. त्यावेळी फिर्यादी यांना रामदास जाधव यांनी सांगितले की, मी पोलीस खात्यात कामाला असल्याने मी माझ्या पत्नीच्या नावाने साईट सुरू करीत आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी मित्रावर विश्वास ठेवून गोपाळवाडी रोडवर दत्तकला पार्क नावाने सुरू होणाऱ्या साईटवर गाळा बुक करण्याचे ठरविले व दि. 7 जानेवारी 2016 रोजी रजिस्टर साठेखत करारनामा लिहून नोंदविण्यात आला.

गाळ्याची बाजारभावाप्रमाणे संपूर्ण किंमत 12 लाख 20 हजार रू. दिपाली रामदास जाधव व रामदास लक्ष्मण जाधव यांना देण्याची ठरली. यानंतर फिर्यादी यांनी जाधव यांना वेळोवेळी धनादेश व रोखीने एकूण 9 लाख 97 हजार 600 रु. दिले. करारनाम्याच्या अटी व शर्तीनुसार फिर्यादी यांना 18 महिन्याच्या आत त्यांना त्यांच्या गाळ्याचा ताबा देणे आवश्यक होते, परंतु आज पर्यंत त्यांना गाळा ताब्यात मिळालेला नाही. दरम्यान फिर्यादी यांनी वारंवार जाधव यांच्याशी संपर्क करीत गाळ्याचा व्यवहार पूर्ण करण्याची किंवा दिलेली रक्कम परत करण्याची विनंती केली.

परंतु त्यांना फक्त उडवा उडवी ची उत्तरे मिळत होती. फिर्यादी यांनी वकिलामार्फत सुद्धा नोटीस पाठवून व्यवहार पूर्ण करण्याची विनंती केली असता जाधव यांनी उलट फिर्यादी यांनाच ते खाजगी सावकारीचा व्यवसाय करतात असा आरोप करीत नोटीस पाठविली. त्यामुळे जाधव यांनी फसवणूक केल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दौंड पोलिसांकडे तक्रार केली. दौंड पोलिसांनी दिपाली रामदास जाधव विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.