सासवड : एन.सी. मॅटरमध्ये कारवाई न करण्यासाठी एका व्यक्तीकडून 5 हजारांची लाच घेताना सासवड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला पुणे लाचलूचपत विभागाच्या टीमने अटक केली आहे. आरोपी लोकसेवक विकास लक्ष्मण ओमासे असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदार व त्यांच्या वडीलांच्या विरुद्ध सासवड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या एन.सी. मध्ये कारवाई न करता त्यात मदत करण्याकरिता यातील आरोपी लोकसेवक पोलीस हवालदार ओमासे यांनी तक्रारदाराकडे 3 हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे दिली होती.
यातील तक्रारदाराच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि. 03/01/2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता पडताळणी दरम्यान तक्रारदार व त्यांचे वडील यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या एन.सी. मध्ये तक्रारदार व त्यांचे वडिलांविरुद्ध कारवाई न करता त्यात मदत करण्याकरिता सुरुवातीस 10 हजार लाच मागून तडजोडीअंती 5 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी लोकसेवक विकास लक्ष्मण ओमासे यास ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






