स्वामी विवेकानंद विद्यालयासाठी रोहीत गजरमल यांच्याकडून सव्वा लाखाचे व्यासपीठ भेट

दौंड : दौंड तालुक्यातील आंबेगाव पुनर्वसन (केडगाव) येथील स्वामी विवेकानंद विद्यालयासाठी केडगाव येथील उद्योजक रोहीत चंद्रकांत गजरमल यांनी सव्वा लाख रुपये खर्चून व्यासपीठ बांधून दिले आहे. त्यांच्या या दानशूरपनाचा आज 26 जानेवारी रोजी शाळेकडून विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा जाधव मॅडम यांनी गजरमल यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली.

रोहीत गजरमल यांनी शालेय शिक्षण पूर्ण करून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी कुलस्वामिनी इलेक्ट्रिकल नावे केडगाव येथे स्वतःची कंपनी सुरु करून आपला व्यवसाय वृद्धीगत केला. रोहीत गजरमल यांच्या मातोश्री सध्या केडगाव ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य आहेत. रोहीत गजरमल यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे त्यांच्याकडे विविध कामे घेऊन येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

स्वामी विवेकानंद विद्यालयात अनेक वर्षांपासून व्यासपीठाची गरज होती मात्र आज-उद्या करता करता हे काम प्रलंबित राहिले होते. शाळेच्या काही शिक्षकांनी ही गोष्ट रोहित गजरमल यांना सांगितली आणि व्यासपीठाच्या सर्व खर्चाची जबाबदारी रोहीत गजरमल यांनी घेऊन काही दिवसांतच हे काम पूर्ण करून दिले. त्यांच्या या कार्याचा गौरव आज शाळेकडून करण्यात आला तर ग्रामस्थांनी गजरमल यांच्या कार्याचे कौतुक केले.