जाब विचारणाऱ्या वाहन चालकाला ‘पाटस टोल’ नाक्यावर जबर मारहाण, पाटस टोल नाका की गुंडाचा ‘अड्डा’

अब्बास शेख

Crime News : दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या पाटस टोल नाका हा गुंडाचा अड्डा बनला आहे की काय अशी शंका उपस्थिती केली जात आहे. वाहन चालकांना मारहाण करणे, उद्धट बोलणे असले प्रकार येथे होताना दिसत आहे. पैसे कट झाले म्हणून टोल नाक्यावर जाब विचारायला गेलेल्या वाहन चालकाला हॉकी स्टिक आणि लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आल्याची घटना येथे घडली आहे. याबाबत 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि. 2 सप्टेंबर रोजी पाटस टोल नाका येथे दुपारी 01:15 च्या सुमारास फिर्यादी सुभाष उर्फ विकास ज्ञानोबा कड (वय 48 वर्षे, व्यवसाय-स्टोन क्रशर, रा.सोरतापवाडी, ता.हवेली, जि.पुणे) हे त्यांचा टोल कट झाल्याने त्याबाबत विचारणा करण्यासाठी आणि कट झालेले पैसे परत मागण्यासाठी टोल नाका येथे गेले.

त्यावेळी टोल कर्मचारी सचिन माकर याने, टोल कट झाला असेल तर मी काय करू, तुला काय करायचे ते कर असे म्हणुन फिर्यादी कड यांना शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच टोल कर्मचारी सचिन माकर याने सौरभ माकर, अक्षय भंडलकर, आनंद माकर, भैय्या शितकल यांना बोलावून घेतले. या आरोपिंनी कड यांना हाताने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तर आनंद माकर याने कड यांना त्याच्या जवळील हॉकी स्टीकने डोक्यात मारून जबर जखमी केले.

त्यामुळे कड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी 1) सचिन विठ्ठल माकर 2) सौरभ माकर (पुर्ण नाव माहित नाही), 3) अक्षय राजेंद्र भंडलकर, 4) आनंद माकर, (पुर्ण नाव माहित नाही), 5) भैय्या शितकल (पुर्ण नाव माहित नाही), (सर्व रा.पाटस, ता.दौंड, जि.पुणे) व 6) ज्ञानेश्वर राशनकर सध्या रा.वरवंड, ता.दौंड, जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत.