दौंड मध्ये परीक्षा केंद्राबाहेर अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड, पाठलाग अण वडिलांना मारण्याची धमकी… अखेर दौंड पोलिसांनी ठोकल्या आरोपिंना बेड्या

दौंड (अख्तर काझी) : सध्या सर्वत्र दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. त्यामुळे पेपर झाल्यानंतर परीक्षा केंद्रा बाहेर रोड रोमिओंनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील एका परीक्षा केंद्राबाहेर अल्पवयीन विद्यार्थिनीला छेडछाड करून वारंवार तिचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास दिल्याची तसेच एवढ्यावरच न थांबता रोड रोमिओनी तिच्या वडिलांना मारण्याची धमकी दिली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दौंड पोलिसांनी सदरचे प्रकरण गांभीर्याने घेत दोघा युवकांविरोधात पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

याप्रकरणी विद्यार्थिनीच्या आईने फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी अरबाज हुसेन शेख (रा. कस्तान चाळ, दौंड) व अनोळखी साथीदार यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 74,78,3 (5),351(2),352 बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:15 ते 1 मार्च 2025 रोजीच्या दरम्यान घडली असून दि. 27 फेब्रुवारी रोजी पेपर झाल्यानंतर विद्यार्थिनी भेदरलेल्या अवस्थेत रडतच घरी गेली. आईने तिची विचारपूस केली असता तिने सांगितले की, पेपर सुटल्यानंतर ती घरी येत असताना आरोपी अरबाजने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला, तिच्या अंगाजवळून दुचाकी नेत तिला कट मारला, ती घराजवळ आली असता अरबाज ने तिला फोन कर असा इशारा केला व तो निघून गेला. घरचे आपली शाळा बंद करतील या भीतीने ती गप्प होती, मात्र आज त्रास असह्य झाल्याने तिने आईला सर्व हकीकत सांगितली.

त्यामुळे घडलेला सर्व प्रकार आईने मुलीच्या वडिलांना सांगितला. हे सर्व होत असताना फक्त मुलीची बाजू असल्याने ते सुद्धा शांत राहिले. मात्र दि.28 फेब्रुवारी रोजी विद्यार्थिनी व आई दोघेच घरी असताना अरबाज पुन्हा त्यांच्या घरासमोर आला व सिगारेट ओढत वाईट नजरेने मुलीकडे पहात उभा राहिला. त्यामुळे दोघेही घरात निघून गेल्या. त्यांनी हा प्रकार सुद्धा आपल्या वडिलांना सांगितला. तरीही सगळे शांतच राहिले.

दि. 1 मार्च रोजी सकाळी 9:45 वाजता दरम्यान येथील पोस्ट ऑफिस परिसरात अरबाज दुचाकीवर आपल्या साथीदारा सोबत आला व त्यांनी मुलीच्या वडिलांना शिवीगाळ केली, आपल्याबरोबर असणाऱ्या साथीदाराला त्याने त्यांना मारण्याचे सांगितले. तर याला येथे नको दुसरीकडे मारू असे साथीदाराने त्याला सांगितले. या प्रसंगानंतर मुलीचे वडील भीतीपोटी घरी गेले. अरबाज कडून कुटुंबाला होणारा त्रास असह्य झाल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत आहेत.