दौंड : दौंड शहरात अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या घटना सातत्याने घडत असतानाच आता तर थेट अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याचीच घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पालक वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
दौंड शहरातील एका पाणीपुरी विक्रेत्याच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी संदीप अंकुश कदम (रा.वाटलुज, दौंड) याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ठाणे अंमलदार बापू रोटे यांनी दिली.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 1 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान दौंड शहरातील एका भागात घडली आहे. इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या या अल्पवयीन मुलीस संदीप याने कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी फुस लावून पळवून नेले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास दौंडचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके करीत आहेत.