पुणे (जिमाका) : रोटी (ता.दौंड) येथील प्रथेवरून महिला आयोगाच्या टिप्पणीनंतर शितोळे-देशमुख परिवाराकडून निषेध सभा आयोजित करण्यात आली होती मात्र तरीही येथे घडणारे विशेष प्रकारचे विधी हे अनिष्ट प्रथा असल्याचे मत राज्य महिला आयोगाकडून नमूद करण्यात आले आहे आणि त्या संदर्भात आज रोटी येथे महिला आयोग आणि विविध पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. याबाबत प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले असून त्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि, दौंड तालुक्यात असलेल्या श्री रोटमलनाथ मंदिरात मुलगा झाल्यानंतर आईचे मुंडन करण्याच्या अनिष्ट प्रथेविरोधात व्यापक जनजागृती करणे व अशा प्रथांचे समर्थन करणाऱ्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या बैठकीत चर्चा झाली आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या पुणे येथील विभागीय कार्यालयात आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांच्या अध्यक्षतेखाली रोटमलनाथ मंदिरात मातांचे मुंडन करण्याच्या अनिष्ट प्रथेबाबत बैठक झाली. यावेळी महिला व बाल विकास पुणे विभागीय उपआयुक्त संजय माने, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, परिविक्षा अधिकारी बी. बी. घालमे, जिल्हा संरक्षण अधिकारी ए.सी. मोजर, समुपदेशक ए. जी. शिरसाठ, सरीता वाडेकर, भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील आदी उपस्थित होते.
राज्य महिला आयोग कार्यालयाकडे स्वयंसेवी संस्थेने श्री.रोटमलनाथ मंदिरात मुलगा झाल्यानंतर आईचे मुंडन करण्यात येते, अशी तक्रार केली. याअनिष्ट प्रथेद्वारे महिलांच्या आत्मसन्मानास तडा जात असून त्यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या अनिष्ट प्रथेबाबत प्रसार माध्यमावर प्राप्त झालेल्या चित्रफितीचे अवलोकन केले असता मुलासोबत आईचे मुंडन केल्याबाबतच्या तक्रारीत तथ्य असल्याचे दिसून आले असे राज्य महिला आयोगाने प्रसिद्धी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत या अनिष्ट प्रथेचे समर्थन करणाऱ्या विरोधात कारवाई करणे क्रमप्राप्त असल्याचे म्हटले आहे. बैठकीत चर्चेदरम्यान या अनिष्ट प्रथेबाबत स्वयंसेवी संस्था, समुपदेशक व पोलिस प्रशासन यांच्या सहकार्याने गावात जनजागृती करण्यात यावी असे ठरले.
या बैठकीत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी समन्वय आणि सकारात्मक दृष्टीकोनाबाबत उदाहरण दिले. दौंड तालुक्यातील मौजे कुसेगाव येथील यात्रेच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनामार्फत चर्चा करून योग्य नियोजन करण्यात आले आहेत. यावर्षी गावकऱ्यांकडून पशुहत्याबंदी जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दौंड तालुक्यातील मौजे रोटी येथील मुंडन प्रथेच्या अनुषंगाने पीडित महिलांच्या तक्रारीबाबत शासन आदेशानुसार व कायद्याच्या तरतुदीनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असेही श्री. देशमुख म्हणाले.
आयोगाकडे प्राप्त तक्रार आणि या प्रथेबाबत सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांचे अध्यक्षतेखाली २ जानेवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत मौजे रोटी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी, यवतचे पोलिस निरीक्षक, बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), तालुका संरक्षण अधिकारी, मौजे रोटी येथील सरपंच, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदीनी माहितीसह उपस्थित राहण्याचे आयोगाने निर्देश दिले आहेत, असे आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
टीप – वरील माहिती जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांनी प्रसिद्ध केली आहे.






