मिरज येथील न्यू इंग्लिश स्कुलच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी साकारला भव्य ‘किल्ले प्रतापगड’

सुधीर गोखले

सांगली : मिरज तालुक्यातील इंग्रजी माध्यमातील पहिली शाळा असा नावलौकिक असलेली दि चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कुल च्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी दिवाळी निमित्त शाळेच्या आवारामध्ये किल्ले प्रतापगड साकारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडाची हुबेहूब प्रतिकृती येथे तयार करण्यात आली असून मिरजकरांना हि प्रतिकृती बघण्यासाठी खुली करण्यात आली आहे.

नुकतेच मिरजेतील जेष्ठ धन्वंतरी आणि या शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. विनोद परामशेट्टी आणि सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या मिरज विभागीय उपायुक्त सौ.स्मृती पाटील यांच्या हस्ते या प्रतिकृतीचे उदघाटन झाले. यावेळी डॉ. विकास पाटील, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ रियाज मुजावर, डॉ सूर्यकांत व्हावळ, माजी विद्यार्थी प्रभात हेटकाळे, आयर्न मॅन विजेते अतिश अग्रवाल आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. दिग्विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेचे कला शिक्षक श्री गिरीश गुरव, श्री. उत्तम पाटील यांच्या संकल्पनेतून हि किल्ल्याची प्रतिकृती उभी राहिली आहे ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ संकल्पनेतून हि किल्ले प्रतापगडाची प्रतिकृती आम्ही उभी केल्याचे दिग्विजय चव्हाण यांनी सहकारनामा शी बोलताना सांगितले.

जेष्ठ धन्वंतरी डॉ परामशेट्टी म्हणाले कि नेहमी माजी विद्यार्थी संघटना हि अशा समाजउपयोगी असणाऱ्या प्रत्येक घटकांच्या पाठीशी असेल आणि होतकरू विद्यार्थी, विद्यार्थीनींना नेहमी प्रोत्साहन देत राहील. उपायुक्त सौ.स्मृती पाटील यांनीही या उपक्रमाबद्दल गौरोवोद्गार काढताना न्यु इंग्लिश स्कुलचे कार्य उत्तम आहे आणि कौतुकास्पद आहे. आजच्या पिढीला आपला इतिहास माहिती असणे हि काळाची गरज आहेच आणि पालकांनीही आजच्या पिढीला तसे संस्कार दिले पाहिजेत तरच उद्याचा आपला भारत देश हा वैभवशाली होईल असे म्हटले.

सदर कार्यक्रमासाठी दि चैतन्य एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर चव्हाण, प्रशासकीय अधिकारी श्री दिग्विजय चव्हाण, श्री गजानन चव्हाण, श्री आदित्य चव्हाण, तसेच प्राथमिक मुख्याध्यापिका उज्वला भिऊंगडे, माध्यमिक मुख्याध्यापक श्री अरुण माने, उप मुख्याध्यापक श्री उत्तम पाटील, पर्यवेक्षिका सौ माधुरी जाधव तसेच शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.