‛हवालदार’ ला चार चोरट्यांनी मारहाण करत लुटले, यवत पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गावरील घटना

Crime News

दौंड : दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावर मारहाण करून चोरी करण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अगोदर गाडीवर बसवायचे आणि थोड्या अंतरावर जाऊन लिफ्ट दिलेल्या इसमाला जबर मारहाण करून त्याच्या जवळील रक्कम आणि वस्तू लुटून फरार व्हायचे असा काहीसा प्रकार सुरू आहे. काल असाच एक प्रकार यवत पोलीस स्टेशन हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावरील बोरी ऐंदी जवळ घडला असून याबाबत यवत पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आप्पासाहेब संभाजी हवालदार (रा. उरुळी कांचन, ता.हवेली) हे एमटेक कंपनीच्या गेट समोर सोलापुर-पुणे हायवे रोडवर त्यांच्या घरी जाण्यासाठी थांबले होते. त्यावेळी त्यांच्याजवळ दोन अनोळखी इसम आले आणि तुम्हाला उरुळी कांचन येथे सोडतो असे म्हणत फिर्यादीला काळे रंगाच्या बजाज डिस्कवर गाडीवर मध्यभागी बसवून बोरीऐंदी गावचे हद्दीत रोडच्या कडेला असणाऱ्या पत्रा शेड जवळील मोकळ्या जागेत घेऊन गेले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला चाकू चा धाक दाखवून खाली पाडले तसेच एकाने अंगावर बसुन त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली आणि त्याच्या दुसऱ्या साथीदाराने त्यांच्या खिशातील मोबाईल व पॉकेट काढुन घेवुन हाताने व लाथाबुक्यांनी जबर माराहण केली.

यावेळी तेथे अजून दोन अनोळखी इसम आले आणि त्यांनीही फिर्यादीला हाताने व
लाथाबुक्यांनी मारहाण केली. मारहाण करताना त्यांचेपैकी एका इसामाने फिर्यादीच्या तळहातावर चाकु मारून दुखापत केल्याने ते जीवे मारतील या भितीने फिर्यादी तेथुन कसेबसे पळुन जाण्यात यशस्वी झाले.

यावेळी आरोपींनी फिर्यादींचा १२ हजार रुपयांचा मोबाईल, ४०० रुपयांचे पॉकेट
त्यामध्ये असलेले आधारकार्ड, ड्रायव्हींग लायन्सस, पॅन कार्ड, बँक ऑफ इंडिया व स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम कार्ड व ४०० रुपये रोख रक्कम चोरून नेली. घटनेचा अधिक तपास पोसई शेख करीत आहेत.