बारामती तालुक्यात चाललंय तरी काय.! कुणीही ‛येतो’ आणि ‛लुटून’ जातो…

बारामती : बारामती तालुक्यात सध्या चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. हे चोरटे कधी, कुठून अचानक येतील आणि तुमच्या जवळील पैसे, सोने, मोबाईल लुटून नेतील याचा भरवसाच राहिला नाही. असाच अनुभव येथील भाऊसो दादा मासाळ (मासाळवाडी, ता.बारामती) यांना आला आहे. त्याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात त्यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी भाऊसो मासाळ हे बारामती मोरगाव रोडवरून जात असताना त्यांच्या मागून टिव्हीएस गाडीवर आलेल्या २५ ते ३० वयोगटातील तीन अनोळखी युवकांनी त्यांच्या दुचाकीला लाथ मारून त्यांची गाडी थांबवली. त्यावेळी या तरुणांनी तोंडाला रूमाल बांधलेले आणि अंगात काळे जरकीन घातलेले होते.

यातील एका इसमाने फिर्यादीला चाकुचा धाक दाखवून पाठीमागील खिशातील १२ हजार रुपये जबरदस्तीने काढुन घेतले तर दुसऱ्याने त्यांच्या शर्ट च्या खिशातील १२ हजारांचा मोबाईल जबरदस्तीने काढुन घेवुन जर याबाबत कुणाला काही सांगितले तर तुला सोडणार नाही अशी धमकीही दिली आहे. बारामती शहर आणि तालुक्यात सध्या चोरट्यांनी हैदोस घातला आहे. चोरी, लूटमार आणि चैन स्नॅचिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे बारामती, वडगाव निंबाळकर पोलिसांनी वेळीच या चोरट्यांचा बंदोबस्त केला नाही तर पुढील काळात एखादी भयानक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.