अख्तर काझी
दौंड : जमीन मोजणीच्या कारणावरून दौंड तालुक्यातील जिरेगाव येथील एका कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत गज व लाकडी दांडक्याने जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमोल आबासो मचाले (रा. मचाले वस्ती, जिरेगाव, दौंड) यांनी फिर्याद दिली असून रोहिदास ज्ञानदेव मचाले, ज्ञानदेव केशव मचाले, कमल ज्ञानदेव मचाले, गौरी रोहिदास मचाले (सर्व रा. मचालेवस्ती, जिरेगाव, दौंड) यांच्यावर अशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.29 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 च्या सुमारास फिर्यादी यांची त्यांचे चुलते ज्ञानदेव व इतर आरोपी यांच्याबरोबर जमीन मोजणीच्या कारणावरून बाचाबाची झाली. त्यानंतर फिर्यादी दिवसभर आपल्या पोल्ट्रीवर काम करीत होते. रात्री 10 च्या दरम्यान फिर्यादी पोल्ट्री च्या अंगणात उभे असताना अचानकपणे रोहिदास मचाले, ज्ञानदेव मचाले, कमल मचाले व गौरी मचाले त्या ठिकाणी आले व फिर्यादी यांना म्हणाले की सकाळी तुला लय माज आलता का, असे म्हणून त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत रोहिदास मचाले याने लोखंडी गजाने तर ज्ञानदेव, कमल व गौरी मचाले यांनी लाकडी दांडक्याने त्यांना जबर मारहाण केली.
मारहाण झाल्याने फिर्यादी मोठ्याने ओरडल्याने त्यांचा भाऊ व भावजय हे त्यांना सोडविण्यासाठी आले असता त्या दोघांनाही मारहाण करण्यात आली. दरम्यान भावजय हिच्या गळ्यातील गंठण गौरी मचाले हिने हिसकावून घेतला असे फिर्यादित म्हटले असून फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना शिवीगाळ करीत, जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेले. दौंड पोलिसांनी चारही आरोपीं विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.