दौंड : हॉटेलमध्ये भाजी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाबरोबर वाद झाल्याने त्याला हॉटेल मालकासह इतर तिघांनी जातिवाचक शिवीगाळ करीत मारहाण केल्याने दौंड पोलिसांनी हॉटेल मालकासह तिघांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी आनंद लक्ष्मण सदाफुले (रा. जनता माध्यमिक विद्यालयाजवळ, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. ओंकार जगताप, हर्षवर्धन संजय जगताप, संजय जगताप, निखिल बागल (सर्व रा. हॉटेल भावना शेजारी, दौंड) अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी रात्री 11.15 वा. सुमारास फिर्यादी, हॉटेल भावना येथे भाजी आणण्यासाठी गेले असता त्यांची आणि ओंकार जगताप यांची शहरात साजरी झालेल्या शिवजयंती विषयावर चर्चा सुरू होती. त्यावेळेस हर्षवर्धन, वडील संजय जगताप व आत्या भाऊ निखिल बागल हॉटेलमध्ये होते. बोलणे होत असताना आमची पण जयंती चांगली झाली असे फिर्यादी म्हणाले. यावेळी हर्षवर्धन जगताप म्हणाला की, तुमची पण जयंती चांगली होते म्हणजे तुम्ही स्वतःला काय समजता, तसेच जातीवाचक बोलून आमचे पुढे छाती करून आमची बरोबरी करता का? तुम्ही … आहे आणि ….च राहणार असे म्हणून फिर्यादी बरोबर वाद करू लागला.
यावेळी तिथे असलेल्या आरोपींनी शिवीगाळ करीत मारहाण केली व तुम्हाला सोडले नाही पाहिजे, तुम्हाला खूप आरक्षण झाले आहे म्हणत फिर्यादीला हाणामारी केली. फिर्यादी यांना मारहाण होत असताना त्यांच्या घरच्यांनी मध्यस्थी करीत भांडणे सोडवली व दौंड पोलीस स्टेशन येथे येऊन संबंधितांविरोधात फिर्याद दाखल केली. दौंड पोलिसांनी सर्व आरोपीं विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस करीत आहेत.