अख्तर काझी
दौंड : दौंड शहरातील सर्व समाज गुण्या गोविंदाने राहत आहेत. येथील सर्वच समाजाचे सण, उत्सव दौंडकर एकत्र येत साजरे करतात अशी दौंडची परंपरा आहे. असे सर्व काही चांगले चालले असताना येथील काही बोटावर मोजण्याइतके समाजकंटक दौंड शहराची शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समोर येत आहे.
काहींनी औरंगजेबाचे उदात्तीकरण केले आहे, तर काहीं इस्लाम धर्माविषयी आक्षेपार्ह विधान करीत आहेत. या समाजकंटकांचा, दौंड शहर अशांत करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे लक्षात येत आहे. आपले दौंड शहर शांत रहावे म्हणून सातत्याने प्रयत्न करणाऱ्या येथील हिंदू-मुस्लिम-दलित संघटनांनी सुद्धा आता दक्ष राहून या समाजकंटकांचे शहर अशांत करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्व समाजाची एकत्र बैठक घेऊन चांगला निर्णय घ्यावयाची गरज निर्माण झाली आहे.
आपले शहर अशांत व्हावे, येथे जातीय तेढ निर्माण व्हावी असे येथील कोणत्याच समाजाला मान्य नाही. मात्र काही मोजक्या समाजकंटकांनी शहर अशांत करण्यासाठी प्रयत्न चालविलेले आहेत हे निदर्शनास येत आहे. त्यामुळे येथील सर्व समाजातील प्रमुखांनी, पोलीस प्रशासनासह बैठक घेऊन येणारी रमजान ईद, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गाव जत्रा हे सण सर्वांना आनंदाने साजरे करता येतील यासाठी प्रयत्न करण्याची अत्यंत गरज असल्याची प्रतिक्रिया दौंडकरांकडून येत आहे.
दौंड शहर अशांत करण्यासाठी प्रयत्न करणारे, मग ते कोणत्याही समाजाचे असोत अशा समाजकंटकांवर दौंड पोलिसांनी कडक कारवाई करून येथील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी असेही बोलले जाऊ लागले आहे.