दौंड : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून, शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवर, भ्रमणध्वनीवर ( मोबाईल) बोलताना त्याची सुरुवात ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ ने करावी असे आवाहन शासनाने परिपत्रकाद्वारे केले आहे.
या परिपत्रकाला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या संविधान प्रेमी ग्रुप च्या कार्यकर्त्यांनी विरोध करीत सदरच्या परिपत्रकाची होळी केली. यावेळी भारत सरोदे, नागसेन धेंडे, मतीन शेख, अमोल सोनवणे, अश्विन वाघमारे, दीपक सोनवणे, श्रीकांत शिंदे, जावेद सय्यद, प्रकाश सोनवणे, अनिल साळवे, नरेश डाळिंबे तसेच भीम अनुयायी उपस्थित होते.
भारतीयांनी बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेचा स्वीकार केला असून देशाचे संविधान धर्मनिरपेक्ष आहे. संविधानानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला मूलभूत अधिकार प्राप्त आहेत. सदर परिपत्रकाची शासकीय कार्यालयात सक्ती केल्यास तेथील कर्मचाऱ्यांच्या मूलभूत हक्कावर गदा येत असून, शासकीय सेवेतील अधिकारी,कर्मचारी हे सर्व धर्माचे असल्याने संविधान विरोधी असणारे हे वादग्रस्त परिपत्रक मागे घ्यावे अशी मागणी यावेळी संविधान प्रेमींकडून करण्यात आली आहे.