दौंड : दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका महिला पदाधिकाऱ्याचा दौंड पंचायत समिती कार्यालयामधील शिपायाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेने दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे व पंचायत समिती चे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांची भेट घेत सदर घटनेची माहिती दिली. दौंड पोलिसांनी पंचायत समिती कार्यालयाचा शिपाई विकास कवळे याच्या विरोधात विनयभंग (354,ड) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार दि. 5 ऑक्टोबर रोजी आरोपीने फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर अश्लील मेसेज केले, तसेच दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सुद्धा आरोपीने फिर्यादीच्या तब्येतीची विचारपूस करण्याच्या बहाण्याने फोन केला. तुम्हाला बरे वाटत नसेल तर मला शनिवार, रविवारी सुट्टी असते मी तुम्हाला बाहेर फिरावयास घेऊन जातो अशा अश्लील भावनेने, व लज्जास्पद भाषेत फोन केला.
पिडीतेने दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अजिंक्य येळे यांची भेट घेत सदर घटनेबाबत माहिती दिली असता, अजिंक्य येळे यांनी सांगितले की अशा तक्रारीनंतर या विषयाबाबत एक समिती गठीत करण्यात येते. समितीसमोर तुमच्या प्रकरणाची, आरोपाची माहिती देऊन त्याची शहानिशा झाल्यानंतर समिती संबंधितावर कारवाई करेल.