पत्नीला मारहाण करणाऱ्या पती विरोधात दौंड’मध्ये गुन्हा दाखल

अख्तर काझी

दौंड : सतत दारू पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीविरोधात दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुजमिल सलीम शेख(रा. सोनवडी, दौंड) असे गुन्हा दाखल आरोपीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मुजम्मिल याला दारू पिण्याचे व्यसन आहे. आरोपी दारू पिऊन घरी येतो व फिर्यादीस, तुला घर खर्चासाठी मी पैसे देतो तू त्याचा खर्च, हिशोब का दाखवीत नाही असे म्हणत अश्लील भाषेत शिवीगाळ करतो. या कारणास्तव आरोपीने फिर्यादीस लाकडी दांडक्याने( बेलन) मारहाण करून दुखापत केली आहे तसेच तू इथे राहायचे नाही व तुझा भाऊ कोठेही दिसला तर त्यालाही मारीन अशी धमकी सुद्धा आरोपीने फिर्यादीस दिली आहे.

आरोपीने घरातील प्रापंचिक सामानाची ही तोडफोड करून नुकसान केले असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद आहे. दौंड पोलिसांनी आरोपी विरोधात भा. द. वि. 323,324,504,506,427 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. हवा. महेंद्र गायकवाड करीत आहेत.
एखाद्या गरीब आई बापाच्या काळजाचा तुकडा लग्न करून घरी आणायचा व ते गरीब असल्याचा तसेच त्यांच्या पाठीमागे उभे राहणारे कोणी नाही या परिस्थितीचा फायदा उठवायचा व आपले बाहेरील शौक भागविण्यासाठी त्यांचा छळ करायचा, त्यांना मारहाण करायची व या विरोधात आवाज उठविला तर आणखीन मारण्याची धमकी द्यायची अशा प्रवृत्तीं सध्या वाढत आहेत.

अशा नराधमांना वेळीच जरब बसविण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करून गोरगरीब कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे. अशा गरीब कुटुंबीयांना समाजातून कोणाचीच साथ मिळू नये ही शोकांतिका आहे. किमान पोलिसांनी तरी अशा पीडित कुटुंबीयांना साथ देत त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.