14 वर्षांपूर्वी ग्रामपंचायत मिळकतीचा खोटा 8 अ बनवून दिल्या प्रकरणी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकासह सात जणांवर गुन्हा दाखल

खेड : एका जागेच्या मिळकतीचा बनावट 8 अ बनवून देणे तत्कालीन ग्रामसेवक आणि सरपंचाच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच यांच्यासह 7 जणांवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौ.रोहिणी आनंदराव दौंडकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २०/०५/२००९ रोजी ग्रामपंचायत गुळाणी (ता.खेड) येथे व सह दुय्यम निबंधक कार्यालय खेड (जि.पुणे) येथे आरोपी यांनी संगनमत करून तात्कालीन ग्रामसेवक मनिशा व्ही. वळसे व तात्कालीन सरपंच सौ. कुंदा दिलीप ढेरंगे यांनी बनावट नमुना ८ अ चा ग्रामपंचायत मिळकतीचा उतारा तयार करून तो अस्तीत्वात आणला. आणि तो शरद कुलकर्णी, प्रभाकर कुलकर्णी, सुनिल कुलकर्णी, मिनाक्षी कुलकर्णी, मंगल चंद्रचूड यांना दिला. त्यांनी तो खरा आहे असे भासवुन त्याचा २००९ मध्ये दस्ताचा स्व:ताच्या फायद्यासाठी उपयोग करून मिळकत क्रमांक १६३६ हा रामदास नामदेव आरुडे व राजेंद्र रघुनाथ सुतार (दोघे रा. गुळाणी ता. खेड जि. पुणे) यांना विक्री केला होता.

या सर्व प्रकारामध्ये गुळाणी ग्रामपंचायत व शासनाची फसवणुक केली असल्याने फिर्यादी यांनी वरील इसमांविरुद्ध फिर्याद दिल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि रानगट करीत आहेत.