पाटस मध्ये स्टेटस ठेवणाऱ्या 2 आणि त्यांना मारहाण करून दंगल माजविणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल

दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथे वादग्रस्त स्टेटस ठेवले म्हणून एका अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या नातेवाईकांना मारहाण करून दंगल माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या 10 जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वादग्रस्त स्टेटस ठेऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेऊन त्या अल्पवयीन मुलासह अन्य एकावरही यवत पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती यवत पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काल एका अल्पवयीन मुलाने त्याच्या मोबाईलमध्ये वादग्रस्त स्टेटस ठेवले म्हणून त्यास एका टोळक्याने भर चौकात बेदम मारहाण करत दंगल माजवत त्याचे व्हिडीओ काढले होते. हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर मात्र अनेकांकडून त्यांच्या या कृतीवर टीकेची झोड उठली आणि अनेकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत दोन्ही घटनांचा निषेध केला. तसेच कायदा हातात घ्यायचा कुणालाच अधिकार नसून जर एखाद्याने वादग्रस्त स्टेटस ठेवले असेल तर त्याच्यावर थेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवायला हवा आणि त्याला कायद्याने त्याच्या कर्माची शिक्षा मिळायला हवी असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

कालच्या या घटनेनंतर पोलिसांनी स्टेट्स ठेवणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हे दाखल केले तर त्यांना मारहाण करणाऱ्या दहा जणांवर गुन्हे दाखल केले असून कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे त्यामुळे पोलीस त्यांचे काम करतील मात्र काहीतरी वेगळे करून परिसरात दहशत माजविण्यासाठी जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर पोलीस प्रशासन त्यांना जशास तसे उत्तर देईल असा इशाराच पोलिसांनी आपल्या या कृतीतून सर्वांना दिला आहे. घटनेचा अधिक तपास सपोनि नागरगोजे करीत आहेत.

पालकांनो आपल्या मुलांवर लक्ष द्या… सध्या धार्मिक, जातीय तेढ निर्माण करण्याचे पेव फुटले आहे. कुणीतरी एकजण आपल्या मोबाईलमध्ये आपल्या धर्माचे गुणगान करत वादग्रस्त स्टेटस ठेवतो आणि मग त्याला खुन्नस देण्यासाठी दुसराही स्वतःच्या धर्माचे गुणगान करत स्टेटस ठेवतो. या स्टेटस युद्धातून मग काही संधी साधू संधीचा फायदा घेत थेट दंगल भडकविण्याचे काम करतात आणि आम्ही जे केले ते योग्य होते या अविर्भावात वातावरण दूषित करून ठेवतात. वास्तविक पाहता दौंड तालुका असो की पुणे जिल्हा या जिल्ह्यामध्ये कुठेही जातिवादाला थारा देणारे लोक सापडत नाहीत. एक दुसऱ्याच्या प्रत्येक सणात सहभागी होऊन एक दुसऱ्याला शुभेच्छा देणारे लाखोजण या जिल्ह्यात सापडतात. मात्र या एकीला तडा जावा अशी काही कृत्ये समोर आली की मग त्यांचाही नाईलाज होतो आणि जे घडायला नको ते त्यांना डोळ्यांनी पहावं लागतं. हे सर्व घडत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे स्टेट्स ठेवणाऱ्या मुलांचे वय. अल्पवयीन मुले किंवा नुकतेच वयात आलेली मुले सोशल मिडीयाच्या आहारी जाऊन नको ते व्हिडीओ, नको त्या पोस्ट पाहून आपणही काहीतरी वेगळे ठेवावे आणि लक्ष वेधून घ्यावे या प्रयत्नात नको ते स्टेटस ठेवतात आणि येथूनच सामाजिक सलोखा बिघडण्याचे काम सुरू होते. त्यामुळे पालकांनो आपल्या मुलांवर थोडे लक्ष द्या आणि मोबाईलमध्ये आपला मुलगा काय पाहतोय, काय ठेवतोय याकडे लक्ष देऊन त्याला वेळीच सावध करा म्हणजे पुढे घडणारे अनर्थ टाळले जातील.