नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी बँकेच्या 5 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, थकीत कर्जप्रकर्णी दिला जात होता मानसिक त्रास

मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी फायनान्स बँकेच्या 5 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन देसाई यांना थकीत कर्जप्रकरणी या बँकांच्या अधिकाऱ्यांकडून मानसिक त्रास दिला जात होता त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचे नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा नितीन देसाई यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून ‘ECL फायनान्स कंपनी / एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी यांच्यावर खालापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई जवळील कर्जत येथे नितीन देसाई यांचे 54 एकरमध्ये एनडी स्टुडिओ होते. त्यावर नितीन देसाई यांनी कर्ज घेतले होते मात्र कोरोना काळात त्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. या बँकांचा ससेमिरा त्यांच्यामागे असल्याने ते मानसिक तणावातून जात होते. अखेर या सर्व मानसिक त्रासाला कंटाळून अखेर त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. आज नेहा देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

कोरोना काळानंतर अनेक पतसंस्था, बँकांनी नागरिकांना सळो की पळो करून सोडले.. खाजगी सावकाराला लाजवेल असा काही पतसंस्थांचा प्रताप.. नितीन देसाई यांच्या आत्महत्येची पुनरावृत्ती होण्याची भीती
नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर आता विविध बँका आणि पतसंस्थांच्या कारभारावर लक्ष वेधले जात आहे. कोरोना काळ हा तब्बल 2 वर्षे चालला. या काळात व्यवसाय, धंद्यांवर मोठा परिणाम झाला. या काळात सर्व व्यवहार, धंदे बंद करण्यात आले होते. अनेकदा नागरिकांना दररोजच्या दैनंदिन गर्जाही पूर्ण करता येत नव्हत्या. अश्या काळात ज्यांचे पतसंस्था आणि बँकांचे हफ्ते थकले त्यांच्यावर नंतरच्या काळात या पतसंस्था आणि बँका अक्षरशः तुटून पडल्याचे दिसून आले आहे.

कोरोना काळातील कुठलीही सूट या पतसंस्थांकडून कर्जदारांना मिळाली नसल्याचे समोर येत आहे. या काळातील रखडलेले हफ्ते आणि त्यावर आकारलेले व्याज तसेच दोन वर्षे उलटले असल्याने संपलेली मुदत हे सर्व मुद्दे पुढे करून अश्या पतसंस्थांचे आणि बँकांचे लोक कर्जदारांना मोठा मानसिक त्रास देत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे खाजगी सावकारांना लाजवेल अश्या पतसंस्थांना आणि बँकांना वेळीच रोखले नाही तर नितीन देसाई यांसारख्या अजूनही आत्महत्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही.