दौंड : खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्यावरून दौंडमध्ये मोठा राडा झाल्याचे पहायला मिळाले. खा. संजय राऊत यांना रविवारी सायंकाळी काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील एका मंगल कार्यालयाच्या उदघाट्नासाठी जायचे होते. त्यामुळे काहीकाळ आराम करण्यासाठी ते दौंड शहरातील एका हॉटेलमध्ये थांबले होते.
रविवारी दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढे काष्टीला जाण्याचा कार्यक्रम आखला मात्र यावेळी मराठा सामाजातील काही तरुण आक्रमक होऊन हॉटेलच्या बाहेर येऊन थांबले आणि येथे पत्रकार परिषद घेता मात्र मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषण स्थळी तुम्ही जात नाही, नेतेमंडळींना मराठा मोर्चेकऱ्यांकडून गाव बंदी करण्यात आली असताना तुम्ही येथे आला कसे असा सवाल करत या तरुणांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. काहीकाळ तणाव निर्माण झाल्यानंतर खा.संजय राऊत यांनी पंधरा मिनिटांमध्ये जर हॉटेल सोडून बाहेर गेले नाहीत तर आम्ही हॉटेलमध्ये घुसू असा काहींनी पवित्रा घेतला. मात्र संजय राऊत यांनी या तरुणांच्या मागणीला न जुमानता आपला नियोजित कार्यक्रम सुरूच ठेवला तर या तरुणांनीही घोषणाबाजी करण्यात कुठली कसर ठेवली नाही.
खासदार संजय राऊत यांनी यावेळी तीनदा पत्रकार परिषद घेतली. पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये खा.राऊत यांनी बोलताना, गावबंदी ही सत्ताधारी मंत्र्यांना आणि आमदारांना झाली पाहिजे असे म्हणत आरक्षण देण्याची ही सगळी जबाबदारी मोदींची आहे. राज्य कर्त्यांनी जरांगे पाटील यांना ताबडतोब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे घेऊन जावं. ते शिर्डीत असताना का भेटले नाहीत असा सवाल त्यांनी उपाlस्थित केला. आम्ही पुढची भमिका लवकरच जाहीर करू असे म्हणत आज सकाळपासून उद्धव ठाकरे आणि माझ्यात जी चर्चा सुरु आहे ती केवळ जारांगे पाटील यांच्या आंदोलन बाबत सुरू आहे. आताच आमच्या दोघात चर्चा झाली. त्यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतिबद्दल काळजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे एक निवेदन प्रसिद्ध करत आहेत. मराठा आरक्षणासाठी उद्धव ठाकरे निवेदन काढत आहेत. सरकार कुठलंच पाऊल टाकताना दिसत नाही. राज्यात चिंताजनक परिस्थिती आहे. उद्धव ठाकरे यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. आम्ही याबाबत अनेकांशी चर्चा करत आहोत. राज्य सरकारने केंद्र सरकार बरोबर चर्चा करवी आणि आदेश काढावेत. आम्ही सकाळपासून त्याच गोष्टीवर चर्चा करत आहोत. आम्ही तुमच्या भावना समजू शकतो. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमच्या बाजूने लढत आहोत. जारांगे पाटील यांच्या तब्येतिची आम्हाला काळजी आहे असे ते म्हणाले.
दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये खा. संजय राऊत यांनी बोलताना, माझं आणि दौंड शहराच काय नात आहे आणि ते जूनं आहे असे म्हणत ‘घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते मराठा समाजाचे नसावेत’ असा टोला त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना लागवला.
आज आमच्या समोर हाच प्रश्न आहे की मनोज जरांगे पाटील यांचा जीव वाचायला हवा. सकल मराठा समाजाला न्याय मिळावा ही आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातल्या आत्महत्या थांबवल्या पाहीजे ही आमची भूमिका आहे पण सरकारला शिंदेचे राजकीय प्राण वाचवण्यात अधिक रस दिसत आहे असे ते म्हणाले. आणि आम्ही स्वतः केंद्र सरकार सोबत चर्चा करणार असून आंदोलन आता थांबायला हवं यासाठी केंद्र सरकारने याबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी भूमिका त्यांनी मांडून विरोधी पक्षाकडून काही सहकार्य हवं असल्यास आम्ही देण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी जाहीर केले.
तर तिसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये खा. संजय राऊत यांनी बोलताना, या सरकारमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे. यात सगळ्यात वर कुणाचं नाव आहे हे सर्वांना माहित आहे असे म्हणतं त्यांनी काही नेत्यांची नावे घेतली. भ्रष्टाचार आणि कोट्यवधी रुपयांचा अपहार चे आरोप असणाऱ्यांना भाजप स्वच्छ करून आपल्या बाजूला बसवतं. राज्यात असे दहा ते बारा मंत्री आहेत. अजित पवार यांचा घोटाळा तुम्ही स्वतः जाहीर केला आणि नंतर तुम्हीच त्यांना मंत्री केलं असे ते म्हणाले. राज्यात जो पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत हे असंच होत राहणार. २०२४ नंतर राज्यात आणि देशात शंभर टक्के बदल होणार आहे. तेव्हा हे सगळे लोक तुरुंगात जातील असे ते शेवटी म्हणाले. पत्रकार परिषद आटोपून ते सायंकाळी काष्टीच्या दिशेने रवाना झाले.