‘पारगावच्या’ टेम्पो चालकाने लावला होता शेतकऱ्यांना 18 लाखांचा चुना, सातारा पोलिसांनी खाक्या दाखवताच कबूल केला चोरीचा गुन्हा

पुणे : शिरूर येथील शेतकऱ्यांनी बेळगाव येथे कांदा विक्री करून कांद्याचे रोख पैसे घरी घेऊन परत येत असताना त्यांच्याच पारगाव (ता. दौंड) टेम्पो चालकाने त्यांच्या 18 लाखांवर डल्ला मारल्याची घटना उघडकिस आली आहे. सातारा पोलिसांनी सदर टेम्पो चालकाला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने १८ लाख ६० हजार रुपये साथीदारांच्या सहाय्याने चोरी केल्याचे कबूल केले आहे.

बेळगाव येथे कांदा विक्री करण्यासाठी गेले होते शेतकरी मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा विकण्यासाठी बेळगावला जायचे होते त्यामुळे त्यांनी पारगाव येथील गणेश ताकवणे याचा टेम्पो भाड्याने घेतला आणि ते सर्वजण बेळगाव येथे कांदा विक्रीसाठी गेले. बेळगाव येथे या शेतकऱ्यांना कांदा विक्रीतून १८ लाख ६० हजार रुपये मिळाले. त्यांनी हे सर्व पैसे एका बॅगेत ठेवले आणि ३ डिसेंबर रोजी त्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला.

असा सुरु झाला चोरी करण्याचा प्लॅन बेळगाव वरून येताना ते पहाटेच्या सुमारास वाढे (ता. जि.सातारा) येथे चहा पिण्यासाठी थांबले. त्यावेळी टेम्पोतून काही जण चहा पिण्यासाठी उतरले तर काही जण गाडीत झोपले. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी टेम्पोमधून पैसे ठेवलेली बॅग चोरी करून तेथून पोबारा केला. चोरी झालेल्या बॅगेमध्ये शेतकऱ्यांचे कांदा विक्रीतून आलेले सुमारे १८ लाख ६० हजार रुपये होते. आपली पैशांची बॅग चोरी झाल्याची घटना लोणंद जवळ आल्यानंतर शेतकऱ्यांना समजली. त्यानंतर त्यांनी टेम्पो पुन्हा साताराकडे घेत पोलीस ठाण्यात येऊन चोरी झाल्याची फिर्याद दिली. मात्र हा सर्व चोरीचा प्लॅन टेम्पो चालकाने रचला होता. त्याने बेळगाव वरून येत असताना आपल्या दोन साथीदारांना फोन करून पैशांची बॅग चोरण्याचा कट रचला आणि त्यात तो यशस्वीही झाला होता.

घटना गंभीर असल्याने पोलीस अधीक्षकांनी घातले लक्ष, असा झाला पर्दाफाश घटना गंभीर असल्याने सातारा चे पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या सूचनेनुसार सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनेची माहिती घेऊन टेम्पोचालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना तो संशयास्पद उत्तरे देत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने माहिती देण्यास सुरुवात केली. टेम्पो चालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने त्याच्या अन्य दोन साथीदारांना वाढे फाटा येथे बोलावून घेवून त्यांच्याकडे रोख रक्कम असलेली बॅग चोरी करून दिल्याचे सांगितले.

अन्य दोन आरोपिंचा शोध घेऊन अटक या माहितीच्या आधारे सातारा पोलिसांनी इतर दोन युवकांची माहिती गोळा करून त्यांच्या शोधार्थ एक पथक दौंड तालुक्यात पाठवले आणि वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. सातारा पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे सांगितले. त्यांनी चोरी केलेल्या रकमेपैकी १७ लाख ९९ हजार ४० रुपये रोख रक्कम त्यांच्याकडून जप्त केली आहे. गुन्हा घडताच पोलिसांनी चोरी करणाऱ्या तीन युवकांना तात्काळ ताब्यात घेऊन चोरी झालेली रक्कम हस्तगत केली आहे.

पथकाची कारवाई
सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार सुजित भोसले, निलेश जाधव, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल संतोष घाडगे, रोहित पवार, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष कचरे, सुशांत कदम यांनी केली आहे.