पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला सरकारी कार्यालयांमध्येच हरताळ ! केडगाव ‘पोस्ट ऑफिस’ मध्ये ऑनलाईन पेमेंट सुविधा नसल्याने ग्राहकांना मोठा मनस्ताप

केडगाव / दौंड : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला ऑनलाईन, डिजिटल पेमेंट करून व्यवहार करण्याचे आवाहन करत आहेत. त्यांच्या 26 नोव्हेंबर च्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यांनी देशातील जनतेने ‘केवळ यूपीआय चा वापर’ करून कमीत कमी एका महिन्यासाठी तरी फक्त डिजिटल पेमेंट करावे असे आवाहन केले आहे. मात्र आता सरकारी कार्यालयांमध्येच त्यांच्या या आवाहनाला हरताळ फासला जात असल्याचे समोर येत आहे.

केडगाव येथील पोस्ट ऑफिसमध्ये UPI, डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे येथे येणाऱ्या ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. जर कोणी ऑनलाईन पेमेंट करतो असे म्हटले तर रोख पैसे द्या आमच्याकडे ऑनलाईन पेमेंट स्वीकारले जात नाही असे उत्तर येथील कर्मचाऱ्यांकडून मिळत आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनावर रोख पैसे न आणता बँक खात्यातून डिजिटल पेमेंट करू पाहणाऱ्या ग्राहकांवर पाच पन्नास रुपयांसाठी रोख पैसे गोळा करण्याची नामुष्की येत आहे. याबाबत एका ग्राहकाने पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना याचा जाब विचारला असता, ऑनलाईन पेमेंट केले आणि ते गुंतले तर आम्ही त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही त्यामुळे आम्ही येथे ऑनलाईन, डिजिटल पेमेंट स्वीकारत नसल्याची सारवासारवीची उत्तरे येथील कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहेत.

डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल टाकत, पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांना रोख पेमेंटवर अवलंबून राहणे थांबवावे आणि पेमेंट करताना फक्त यूपीआय पेमेंट वापरावे असे आवाहन केले आहे. मात्र अश्या सरकारी कार्यालयांमध्ये त्यांच्या आवाहनाला हरताळ फासण्याचे काम होताना दिसत आहे.
‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला डिजिटल पेमेंट पद्धती आणि युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) अनुप्रयोगांवर अधिक अवलंबून राहण्याचे आवाहन केले आहे मात्र या सुविधा सरकारी कार्यालयांमध्येच कार्यान्वित नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.