Horrible – काय सांगता… ‛कोरोना’ फिरतोय चक्क केडगावच्या ‛रस्त्यांवर..!



– सहकारनामा

दौंड :

काय म्हणता कोरोना रस्त्यावर फिरतोय? विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे असं तुम्हीच हे किस्से वाचल्यावर म्हणाल..  आणि विशेष म्हणजे दौंड तालुक्यातील केडगावमध्ये या अजबगजब गोष्टी पाहायला मिळत आहेत! 

कारण, ज्यांना कोरोना सदृश लक्षणे जाणवत आहेत, त्रास होतोय असे अनेक लोक कोणालाही काही न सांगता गुपचूपपणे आपले स्वॅब (घशातील

 नमुने) यवत ग्रामिण रुग्णालयात देऊन येत आहेत. पण हे स्वॅब देऊन आल्यानंतर मात्र रिझल्ट येण्यासाठी लागणारा दोन दिवसांचा अवधी कसा घालवावा यासाठी ते आपल्या नातेवाईक, मित्रांसोबत गप्पा गोष्टी करून बिनधास्तपणे व्यतीत करत राहतात आणि मनाला वाटेल तिथे दुचाकी, चार चाकिंमध्ये फेरफटका मारताना दिसत असतात. पण ज्यावेळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो त्यावेळी हे महाशय अचानक कुठे गायब झाले म्हणून नातेवाईक, मित्र त्याची शोधाशोध सुरू करतात आणि हे महाशय मात्र कोविड सेंटरमध्ये किंवा एखाद्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले दिसतात. 

मित्र आणि नातेवाईकांना ज्यावेळी हे समजते की यांनी स्वॅब दिल्यानंतर आपल्यामध्ये वेळ घालवला आहे, एकत्र चहा, नाश्ता केला आहे आणि सोबत फिरला आहे त्यावेळी या नातेवाईक आणि मित्रांचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. आणि हे महाशय तो पर्यंत केडगावच्या प्रत्येक गल्लीबोळातून, रस्त्यावरून, दुकानातून कोरोनाला सैर करवूनही आलेले असतात, शेवटी त्यांनाही नाईलाजाने आपले स्वॅब देऊन पुढील दिवस मोजत बसावे लागतात. 

त्यामुळे अशी वेळ प्रत्येकावर येऊ नये म्हणून ज्या लोकांनी कोविड सेंटरमध्ये किंवा अन्य ठिकाणी जाऊन स्वॅब देऊन पुन्हा घरी आलेले आहेत त्यांनी किमान त्यांचा रिपोर्ट येईपर्यंत तरी घरीच थांबावे आणि स्वतःला आणि नागरिकांनाही कोरोनापासून दूर ठेवावे अशी विनंतीच आता नागरिक सोशल मीडियावरून  करताना दिसत आहेत.