एक दिवा गरिबांसाठी.. मिरजेतील तरुणाईचा आगळा वेगळा उपक्रम

सांगली : [सुधीर गोखले]  कार्तिक पौर्णिमे निमित्त मिरजेतील काही तरुणांनी गोर गरीब नागरिकांसाठी ‘म्हाडा’ संकुलामध्ये जाऊन घरोघरी दीप प्रज्वलन करत एक आगळा वेगळा उपक्रम साजरा केला. ‘एक दिवा गरिबांसाठी त्यांच्या सुख दुःखातिल सहभागासाठी’ मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपचे सांस्कृतिक प्रकोष्ठ राज्य उपाध्यक्ष ओंकार शुक्ल यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.

मिरज मध्ये गरीब कुटुंबासाठी शासनाने बांधलेल्या ‘म्हाडा’ च्या रहिवासी संकुलामध्ये काल ओंकार शुक्ल यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत तब्ब्ल शंभर उंबऱ्यांमध्ये दीप प्रज्वलाची आरास केली आणि आपणही त्यांच्या सुख-दुःखात  सहभागी असल्याचे दाखवून दिले.  या उपक्रमाने येथील रहिवाशी भारावून गेले आणि आनंदाने त्यांचे डोळे पाणावले. ‘शासनाने आम्हाला घरे बांधून दिली मात्र येथील सोइ सुविधेकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याची खंत येथील रहिवाशांनी सहकारनामा शी बोलताना व्यक्त केली.

यावेळी काही रहिवाश्यांनी बोलताना, मिरजेतील ओंकार शुक्ल आणि त्यांच्या  सहकाऱ्यांनी आमचे अश्रू पुसून आमच्या आयुष्यात  दिव्यासारखी चमक आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे कायम आभारी राहू असे म्हटले आहे. कार्तिक पौर्णिमे निमित्त सुमारे 100 पेक्षा जास्त घरांमध्ये दिवे लावत असताना तेथील रहिवाशांच्या डोळ्यात अश्रू दाटल्याचे पाहायला मिळत होते.  यावेळी त्यांच्यासाठी   केलेली प्रार्थना आणि त्यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे हे लोक गहिवरून गेले. यातील बऱ्याच घरांमध्ये ऐन दिवाळीत सुद्धा वीज नसल्याने अंधार कायम होता.  तो या उपक्रमाने दूर करण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला.