– सहकारनामा
सातारा :
संपूर्ण महाराष्ट्रात करोनाने थैमान घातले आहे. हे थैमान रोखण्यासाठी ठाकरे सरकारने कठोर पावले उचलत निर्बंध लागू केले आहेत. तसेच विकेंड लॉकडाऊन सुद्धा लागू केला आहे, मात्र परिस्थिती तरीही हाताबाहेर जात असल्यास महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत सरकार विचार विनिमय करत आहे.
परंतु लॉकडाऊनच्या कोणत्याही निर्णयाला भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र अनोख्या पद्धतीने विरोध दर्शवला आहे. यासाठी त्यांनी अनोखी पद्धत वापरत सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊन विरोधात रस्त्यावर पोते टाकून हातात कटोरा घेत भिक मांगो आंदोलन केलं आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी अगोदरच गोरगरीब जनता रोजगार, व्यवसाय नसल्याने परेशान आहे. यामध्ये आता छोटे मोठे दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत आणि यावेळी पुन्हा एकदा लॉकडाऊन केल्यास हे सर्वजण पुरते बर्बाद होतील असे मत खा.उदयनराजे यांनी व्यक्त केले आहे.
खा.उदयनराजे भोसले यांनी पोवई नाक्यावरील फुटपाथवर एका झाडाखाली बसून आंदोलन केले आहे. यावेळी काहींनी त्यांच्या कटोऱ्यात पैसेही टाकले. लॉकडाऊनमुळे लोक अगोदरच खूप आर्थिक अडचणीत आहेत. अनेक लोकांची उपासमार होत आहे. त्यामुळे लोकांना अडचणीत आणणारा लॉकडाऊन हा पर्याय कसा असू शकतो असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी जर दुकानांवर धंदाच झाला नाही तर त्या दुकानातील कामगारांना पगार कसे दिले जातील. आणि ज्या दुकानदारांनी, व्यापाऱ्यांनी कर्ज काढून दुकानात माल भरला आहे. ती दुकानं बंद ठेवली तर धंदा कसा होणार? आणि बँकांचे हप्ते तरी कसे जाणार असा प्रश्न उपस्थित करत लॉकडाउन पेक्षा लोकांचे लसीकरण करावे अशी सूचनाही त्यांनी सरकारला दिली आहे.