दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये थोरात गटाचे अपक्ष उमेदवार हे कुल गटाच्या पाठिंब्यावर विजयी झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी थोरात-कुल एकत्र आल्याचे दिसत असून थोरात गटाच्या सदस्यांनी मात्र थोरात गटाचाच उमेदवार पाडल्याने तालुक्यातील बहुजन समाजामध्ये याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
केडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये प्रशांत शेळके यांची दोन मतांनी निवड झाली आहे त्यांना एकूण 10 मते पडली आहेत तर थोरात गटाच्या कुसुम गजरमल यांना 8 मते पडली असून दोन मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला आहे. या निवडणुकीमध्ये थोरात गटाचे एक मत फुटल्याने कुसुम गजरमल यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला आहे. या निकालाने माजी आमदार रमेश थोरात यांना मानणाऱ्या केडगावमधील बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांमध्येनाराजी पसरली आहे.
खरे जातीवादी कोण हे तालुक्याने आज पाहिले – पाराजी हंडाळ, कुल थोरात हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सिद्ध बाळासो कापरे.. कुल-थोरात यांची कायम मिलिभगत असल्याचे आणि त्यांचा तालुक्यात एकदुसऱ्याला विरोध हा फक्त दिखावा असल्याची टिका यावेळी केडगाव विकास आघाडीचे बाळासो कापरे यांनी केली आहे. तर दलित समाजाचा उमेदवार जाणूनबुजून पाडण्याची कुल-थोरात गटाची ही जुनी सवय असून पाच वर्षांपूर्वी सरपंच पदाचे उमेदवार गिरीश कांबळे यांच्या सोबत केडगावमध्ये जे घडले तेच आज पुन्हा कुसुम गजरमल यांच्या सोबत घडल्याचे पहायला मिळाले आहे त्यामुळे खरे जातीवादी कोण हे आज बहुजन समाजाच्या लक्षात आले असून यापुढे यांना याचे राजकीय परिणाम भोगावे लागणार असल्याचे केडगाव विकास आघाडीचे पाराजी हंडाळ यांनी म्हटले आहे. तर केडगाव मध्ये माजी आमदार रमेश थोरात यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचेच ऐकत नसतील तर बहुजन समाजाने त्यांचे ऐकायचा ठेका घेतला नाही, यापुढे खऱ्या जातीवाद्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल असा ईशारा पोपट लाड यांनी दिला आहे.
केडगाव येथे केडगाव विकास आघाडी आणि थोरात गट + बंडखोर अशी 10 बेरीज होत होती. मात्र थोरात गटातील एका सदस्याने कुसुम गजरमल यांना मतदान न करता कुल गटाच्या पाठिंब्यावर उभ्या असलेल्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे थोरात गटाचे उपसरपंच पदाचे उमेदवार हे कुल आणि थोरात गटाच्या लोकांनी एकत्र येऊन पाडल्याचे पहायला मिळाले तर केडगाव विकास आघाडी मात्र थोरात गटाच्या कुसुम गजरमल यांच्यासोबत ठामपणे उभी राहिली हे विशेष.