केडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी ‘कुल’ गटाकडून ‘प्रशांत शेळके’ तर ‘थोरात’ गटाकडून ‘कुसुम गजरमल’ यांचा उमेदवारी अर्ज दाखल, थोरात गटाच्या ‘त्या’ सदस्यावर विजयाची भिस्त

अब्बास शेख

दौंड : केडगाव (ता.) दौंड येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी कुल गटाकडून प्रशांत शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांना सुचक म्हणून कुल गटाचे सदस्य अशोक हंडाळ हे आहेत. थोरात गटाकडून उपसरपंच पदासाठी कुसुम गजरमल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांना थोरात गटाच्या पल्लवी बारवकर या सूचक म्हणून आहेत. यावेळी आता थोरात गटाचे बंडखोर सदस्य आणि उपसरपंच पदाचे दावेदार प्रशांत शेळके धरून कुल गट नऊ आणि थोरात गट 3 आणि केडगाव विकास आघाडी 6 असे मिळून सध्या 9-9 असे बलाबल झाल्याचे दिसत आहे. यात आता थोरात गटाचे कट्टर समर्थक तथा ग्रामपंचायत सदस्य थोरात गटासोबत राहतात का या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. कारण कुल गटाच्या उमेदवारासाठी थोरात गटातील काही महत्वाचे पदाधिकारी आणि मार्केट कमिटीचे सदस्य उपस्थित राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

असे आहे दोन्ही गटाचे बलाबल थोरात गटाला केडगाव विकास आघाडीच्या 5 सदस्य आणि सरपंच असे 6 जणांनी पाठिंबा दर्शवीला असून सध्या थोरात गटाचे दत्तात्रय शेळके, कुसुम गजरमल आणि पल्लवी बारवकर असे मिळून 9 सदस्य होत आहेत तर कुल गटाचे 8 सदस्य आणि अपक्ष प्रशांत शेळके असे 9 सदस्य बलाबल झाले आहे. जर उपसरपंच पदासाठी बरोबरी झाली तर सरपंच यांना एक अधिक मतदान करण्याचा अधिकार राहणार आहे.

माजी आमदार रमेश थोरात गटासाठी आजची निवडणूक गरजेची, अन्यथा केडगाव विकास आघाडीचे आरोप खरे ठरणार

दौंड तालुक्यात कुल आणि थोरात असे दोन गट एकदुसऱ्याच्या विरोधात कायम राहत आले आहेत. माजी आमदार रमेश थोरात आणि विद्यमान आमदार राहुल कुल असे दोन प्रतिस्पर्धी तालुक्यात पूर्वीपासून लढत आले आहेत. मात्र मागील काही निवडणुकीमध्ये थोरात गटाकडून निवडून येणारे उमेदवार हे थोरतांनाच ऐनवेळी फसवत आल्याचे दिसत आहे. त्यामुळे थोरात गटातील अनेक नाराज आपला वेगळा गट स्थापन करू लागले आहेत. थोरातांना मानणारा केडगाव विकास आघाडी हाही त्यातीलच एक गट आहे.

आज होत असलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी थोरात गटाच्या कुसुम गजरमल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना आता थोरात गटच साथ देतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आज थोरात गटाचे उमेदवार थोरात गटाच्या बाजूने राहिले तर कुसुम गजरमल या उपसरपंचपदी विराजमान होणार आहेत मात्र जर थोरात गटातूनच त्यांना फटका बसला तर मात्र केडगाव विकास आघाडीकडून करण्यात आलेले थोरात गटावरील आरोप हे खरे ठरणार असून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत याची किंमत थोरात गटाला मोजावी लागणार आहे.