अब्बास शेख
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत ‘थोरात’ आणि ‘कुल’ गटात मोठी चुरस पहायला मिळत आहे. थोरात गटाचे दत्तात्रय शेळके, कुसुम गजरमल, पल्लवी बारवकर आणि बंडखोर उमेदवार म्हणून निवडून आलेले प्रशांत शेळके असे 4 सदस्य आहेत. मात्र केडगाव विकास आघाडीच्या सदस्य आणि सरपंचांचा थोरात गटाला संपूर्ण पाठिंबा मिळत असल्याने हि संख्या 10 पोहचत आहे. मात्र थोरात गटातील एकाच सदस्याची दोन्ही गटात चर्चा होत असून थोरात गट हा आपला उपसरपंच होईल असे म्हणत असला तरी कुल गटही आपलाच उपसरपंच होणार असल्याचा दावा करत आहे.
दोन्ही गटात धाकधूक वाढली, गुप्त बैठकांचा सपाटा कुल गटाची सदस्य संख्या हि 08 असून त्यांना थोरात गटातील काहीजण आतून मदत करू शकतात असे कुल गटातील कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. मात्र या चर्चा होत असताना काही सदस्यांचे कार्यकर्ते मात्र ‘विश्वास ठेवा आणि व्हाट्सअप डीपी पहा’ असे बोलताना दिसत आहेत. त्यामुळे आज उपसरपंच अप्पांचा की दादांचा होणार या बाबत तर्क वितर्क लढवले जात असून उपसरपंच निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. येथे थोरात गटाचे सदस्य हे थोरात गटाला मतदान करणार की फितूर होऊन कुल गटाला जाऊन मिळणार याची जोरदार चर्चा सुरु आहे. थोरात गटातून निवडून आलेल्या सदस्यांनी आपल्या उमेदवाराला मदत करावी म्हणून कुल आणि थोरात गटातील काही दिग्गज नेते मंडळींच्या बैठका पार पडल्या आहेत. एक दुसऱ्याचे तोंड न पाहणारे गावपुढारी आता एकदुसऱ्याला चहा पाजून तालुक्याच्या बाहेर तासंतास यावर खलबते करताना दिसत आहेत. तर थोरात गटातून नाराज होऊन केडगाव विकास आघाडी स्थापन करणारे लोक पुन्हा थोरात गटाला जोडायचे असतील तर आजची निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. येथील केडगाव विकास आघाडीने थोरात गटाला पाठिंबा देऊनही जर थोरात गटात फूट पडली तर मात्र याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये थोरात गटाला पहायला मिळणार आहेत.
उपसरपंच निवडणूक प्रक्रिया अशी पार पडणार.. आज 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत फॉर्म भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. तर 12 ते 1 वाजेपर्यंत छाननी होणार असून दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत माघार घेता येणार आहे. तर दुपारी 02 च्या पुढे निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी निवडणूक प्रक्रिया हि सरपंच पूनम गौरव बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून निवडणूक निरीक्षक म्हणून संजय महाजन काम पाहणार आहेत तर निवडणूक सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी काळे हे काम पाहणार आहेत. आज केडगाव येथे होणाऱ्या उपसरपंच निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून येथे थोरात गटाचे सदस्य हे थोरात गटाला मतदान करणार की फितूर होऊन कुल गटाला जाऊन मिळणार याची जोरदार चर्चा सुरु आहे.