सरपंच पतीने कचरा वाहतूक करणारा ट्रॅक्टर स्वतः ओढून काढला बाहेर, केडगावचा कारभार कडक कपडे घालून ‘मिरवणाऱ्याच्या’ नव्हे तर ‘शेतकऱ्याच्या’ हातात

केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायत निवडणूक संपूर्ण तालुक्यात गाजली होती. या निवडणुकीत केडगाव विकास आघाडीच्या सरपंच पूनम गौरव बारवकर ह्या भरघोस मतांनी निवडून आल्या. निवडून येताच आपण केडगावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी, प्रलंबित कामे आणि कृत्रिमरित्या निर्माण करण्यात आलेल्या अडचणी दूर करू असे आश्वासन त्यांच्यावतीने त्यांचे पती गौरव बारवकर यांनी विजयी सभेत दिले होते.
हे आश्वासन पूर्तता करण्यासाठी त्यांनी पहिले पाऊल टाकले असल्याचे त्यांच्या कालच्या कृतीतून समोर आले आहे.

कचरा वाहतूक करणारा ट्रॅक्टर ओढताना सरपंच पती

12 लाख रुपये खर्च करून केडगाव येथील कचरा वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर आणि ट्रेलर घेण्यात आला होता. मात्र गेल्या कित्येक महिन्यापासून किरकोळ कामामुळे हा ट्रॅक्टर, ट्रॉली केडगाव गावठाण येथे बंद अवस्थेत उभे होते. ही बाब सरपंच पती गौरव बारवकर यांच्या कानावर ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप यांनी टाकताच त्यांनी ग्रामपंचायत नितीन जगताप यांच्यासह गावात जाऊन ट्रॅक्टरची पाहणी केली. यावेळी ट्रॉली चे हाईड्रॉलिक हे ऑइल नसल्याने बंद अवस्थेत उभे असल्याचे त्यांना दिसले. हा ट्रॅक्टर खूप अडचणीत उभा असल्याने तो कर्मचाऱ्यांना बाहेर काढणे अवघड जात होते. यावेळी गौरव बारवकर यांनी स्वतः ट्रॅक्टर चालूकरून तो अडचणीतून बाहेर काढला आणि दुरुस्तीसाठी पुढे पाठवून दिला.

सरपंचपती गौरव बारवकर हे स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना ट्रॅक्टर ने नांगरट करण्याचा आणि तो चालवीण्याचा दांडगा अनुभव आहे. ते ट्रॅक्टर बाहेर काढत असताना काही नागरिकांनी त्यांचा व्हिडीओ बनवला असून या व्हिडीओची तालुक्यात चर्चा होत आहे.
केडगावचा कारभार ‘कडक कपडे घालून मिरवणाऱ्याच्या’ नव्हे तर ‘शेतकऱ्याच्या’ हातात आला असल्याची भावना यावेळी उपस्थित नागरिकांनी बोलून दाखवली.