नागरिकांनो सावध रहा |दौंडमध्ये दोन फ्लॅट फोडून 1लाख 15हजारांचा ऐवज लंपास

अख्तर काझी

दौंड : दौंड पोलीस स्टेशन हद्दीत, चोरट्यांनी दोन बंद फ्लॅटच्या दरवाज्याचे कडी कोयंडे तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना घडली. या दोन्ही घरातून अज्ञात चोरट्यांनी जवळपास 1 लाख 15 हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे.

दोन फ्लॅट फोडून सोने आणि रोख रक्कम लंपास पहिली चोरीची घटना दि. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वा. दरम्यान शालिमार चौकातील निकिता पार्क इमारतीमध्ये घडली. याप्रकरणी योगेश्वरी मधुकर रसाळ (रा.निकिता पार्क, दौंड) यांनी फिर्याद दिली. पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचे पती सकाळी 10 वाजण्याच्या च्या सुमारास घराला कुलूप लावून कामानिमित्ताने बाहेर पडले. सायंकाळी 6:00 च्या दरम्यान फिर्यादी घरी आले असता त्यांना घराचे दार उघडे दिसले. संशय आल्याने त्यांनी घरात पाहणी केली असता बेडरूम मधील कपाट उघडे होते आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले होते, कपाटातील सोन्याचे दागिने व 3 हजार 500 रुपये रोख असा एकूण 56 हजारांचा ऐवज चोरीस गेलेला होता.

दुसऱ्या फ्लॅटमधून 55 हजार 800 रुपयांची चोरी दुसरी घटना 7 नोव्हेंबर रोजी स. 8 ते दुपारी 1.30 दरम्यान गोपाळवाडी येथील देवकी नगरच्या यशोमती अपार्टमेंट मध्ये घडली. याप्रकरणी अशोक पिलारमाडी यांनी फिर्याद दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पत्नी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरीस आहेत. दि. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी दोघे पती-पत्नी फ्लॅट बंद करून कामावर गेले. दु. 1.30 वा दरम्यान फिर्यादी कामावरून घरी आले तेव्हा घराच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तुटलेला व कुलूप खाली पडलेले त्यांना दिसले. घरात जाऊन पाहिले असता त्यांना घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त केलेले दिसले. तसेच कपाटातील सोन्याचे दागिने व 5 हजार रोख रक्कम असा एकूण 55 हजार 800 रुपयांचा ऐवज त्यांना मिळून आला नाही. लागलीच त्यांनी ही बाब त्यांच्या पत्नीला सांगितली तेव्हा त्याही घरी आल्या व दोघांनी सोन्याचे दागिने व रकमेचा शोध घेतला असता ते मिळाले नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्याने डाव साधला असल्याची त्यांची खात्री झाल्याने त्यांनी दौंड पोलिसात तक्रार दिली.