केडगाव ग्रामपंचायत निवडणुक | सरपंच ‘पूनम बारवकर’ यांच्या निवडीमागची ‘ही’ आहेत महत्वाची कारणे

निवडणूक विश्लेषण : अब्बास शेख

दौंड : केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत कुल आणि थोरात गटाला शह देऊन बाळासो कापरे यांच्या केडगाव विकास आघाडीने मोठे यश संपादन केले आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत केडगाव विकास आघाडीच्या पूनम गौरव बारवकर या 544 अश्या भरघोस मतांनी निवडून आल्या आहेत. त्या थेट लोकमतातून निवडून येण्यामागे अनेक महत्वाची कारणे सांगितली जात आहेत. मात्र त्या निवडून येण्यामागे सर्वात मोठे कारण हे माजी जिल्हापरिषद सदस्य बाळासो कापरे यांनी केलेले निवडणुकीचे नियोजन आहे. बाळासो कापरे यांनी या निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवारापासून सदस्य पदाच्या उमेदवारापर्यंत चाचपणी करून विविध वार्डमध्ये उमेदवार उभे केले होते. त्यांनी प्रचारात तरुण, युवा कार्यकर्त्यांना योग्यरीतीने मार्गदर्शन केल्याने तरुणांची मोट बांधण्यात त्यांना येथे मोठे यश मिळाले. योग्य नियोजन, सुसूत्रता आणि जनतेला विकासकामांच्या पूर्तीसाठी आश्वस्त करणे ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू ठरली आहे.

योग्य नियोजन महत्वाचे ठरले कापरे यांनी केडगाव स्टेशन, धुमळीचा मळा आणि हंडाळवाडी वार्डमध्ये विशेष लक्ष केंद्रित करून सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने मतदारांपर्यंत आपले म्हणणे मांडण्यात ते यशस्वी ठरले. गेल्या दहा वर्षांत झालेले कुटील राजकारण आणि स्थानिक व्यक्ती केंद्रित सत्तेला जनता अक्षरशः कंटाळलेली होती. सत्ताबदलाची जनतेची इच्छा कापरे यांनी हेरून त्यांना हवा असा नविन पण स्वच्छ चेहरा देण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयोग यशस्वी ठरला. कापरे यांनी आपल्या प्रचारात जनतेच्या मनातील खदखद ओळखून त्या दृष्टीने आश्वासने दिली जी जनतेनी सहज स्वीकारत त्याचे मतदानात रूपांतर केले.

सत्ताधारी गटाचे कुटील राजकारण आणि स्थानिक पातळीवर थोरात गटात असणारा नियोजनाचा अभाव त्यामुळे ‘तो’ निर्णय घ्यावा लागला

केडगाव ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत कापरे हे पुन्हा सक्रिय झाल्यानंतर त्यांना सत्ताधारी कुल गटाच्या स्थानिक पातळीवरील कुट नितीच्या राजकारणाला तोंड द्यावे लागले. तर थोरात गटात स्थानिक पातळीवर असलेला नियोजनाचा अभाव आणि एक दुसऱ्याचे पाय ओढत बसण्याची सवय या गोष्टी वर्तमान निवडणुकीला मारक असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी आपला केडगाव विकास आघाडी हा पॅनल उभा करण्याची तयारी सुरु केली. याबाबत बाळासो कापरे यांनी ‘सहकारनामा’शी बोलताना याचा खुलासा केला आहे. कापरे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनी केडगाव स्टेशन, धुमळीचा मळा आणि हंडाळवाडी येथे विशेष असे लक्ष केंद्रित केले होते ज्याचा त्यांना या निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचे पहायला मिळाले.

अश्या पद्धतीने बलाढ्य बनत गेली केडगाव विकास आघाडी

केडगाव विकास आघाडी तयार होत असताना अनेक अदृश्य शक्तींनी बाळासो कापरे यांना मदत केली आहे. त्यामध्ये हंडाळवाडीचा प्रामुख्याने येथे उल्लेख करावासा वाटतो. कारण धुमळीचा मळा हा जवळपास माळी समाजाचा बाले किल्ला समजला जातो त्यामुळे तेथे माळी समाजातील उमेदवाराला जास्त मतदान होणार हे सर्वश्रुत होते मात्र हंडाळवाडी या ठिकाणी त्यांना सर्वात मोठी मदत झाली. या ठिकाणी कुल गटाचे भीमा पाटस कारखान्याचे संचालक आणि केडगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच अप्पासो हंडाळ यांचा वरचस्मा राहिलेला आहे. या ठिकाणी केडगाव विकास आघाडीच्या पूनम बारवकर यांना 587 मते, कुल गटाच्या अश्विनी शेळके यांना 498 इतकी मते तर थोरात गटाच्या वनिता शेळके यांना अवघी 30 मते मिळाली आहेत. या ठिकाणी अप्पासो हंडाळ यांचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. यात पुष्पावती अप्पासो हंडाळ यांना 650 तर भाऊसो शेलार यांना 612 मते पडून हे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. मात्र सरपंच पदाला त्यांना येथून मताधिक्य घेता आले नाही. याठिकाणी पाराजी हंडाळ यांची भूमिका महत्वाची ठरली असून त्यांच्या सहकार्याने हे शक्य झाल्याचे बोलले जात आहे. तर धुमळीचा मळा येथेही कुल गटाचे शहाजी गायकवाड यांना धक्का बसला असून त्यांच्या धुमळीचा मळा या वार्डमध्ये पूनम बारवकर यांना 1248, कुल गटाच्या अश्विनी शेळके यांना 295 तर वनिता शेळके यांना 57 मते मिळाली आहेत. या ठिकाणी कापरे यांचा संपूर्ण पॅनल निवडून आला असून कुल गटाला येथे मोठा धक्का बसला आहे. केडगाव स्टेशन येथे पूनम बारवकर यांना 1072, अश्विनी शेळके यांना 756, तर वनिता शेळके यांना 240 मते मिळाली आहेत. तर केडगाव गावठाण येथेही कापरे गटाच्या पूनम बारवकर यांनी आश्चर्यकारकरीत्या 544 मते घेऊन कुल गटाला धक्का दिला असून येथे अश्विनी शेळके यांना 582 तर वनिता शेळके यांना 296 मते मिळाली आहेत. थोरात गटामध्ये येथे दोन गट पडून एका गटाने कापरे गटाचे काम केल्याने येथे थोरात गटाच्या उमेदवारांनाही त्याचा फटका बसला आहे.

टोळी केंद्रित राजकारणाला जनता कंटाळली, बदल करताना नविन चेहऱ्याला पसंती

केडगाव येथील राजकारण अक्षरशः गचाळ पद्धतीचे बनले होते. फंड असूनही कामे केली जात नसल्याचा आरोप होत होता. अनेक ठिकाणी महत्वाचे प्रश्न प्रलंबित होते. महत्वाच्या विषयांकडे जाणूनबुजून डोळेझाक केली जात होती. करोडो रुपये ग्रामपंचायत मध्ये शिल्लक असूनही विकासकामांना खिळ का बसली असा आरोपही होतहोता. त्यामुळे येथील जनतेने सत्ता बदल करण्याचे ठरवले होते मात्र सत्ता देताना नविन आणि स्वच्छ चेहऱ्याच्या शोधात जनता होती आणि तो चेहरा बाळासो कापरे यांनी दिल्याने जनतेने त्यांना मतदान करण्यात कोणतीच कसर ठेवली नाही.

नविन सरपंचांकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या

बाळासो कापरे गटाच्या नवनिर्वाचित सरपंच सौ.पूनम गौरव बारावकर यांच्याकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. केडगावचा रखडलेला विकास आता रुळावर येईल अशी अपेक्षा जनतेला आहे. ग्रामपंचायतमध्ये नागरिकांना दिली जात असलेली दुजाभावाची वागणूक, त्यांची होत असलेली अडवणूक आता बंद होईल आणि केडगावच्या विकासात्मक दृष्टिकोनातून पावले टाकली जातील अशी अपेक्षा नविन सरपंचांकडून जनता बाळगून आहे.

केडगाव ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य पुढील प्रमाणे –

सरपंच – पूनम बारवकर
सदस्य – महेश म्हेत्रे, प्रशांत शेळके, प्रियांका मोरे, अशोक हंडाळ, दत्तात्रय शेळके, पल्लवी बारवकर, भाऊसाहेब शेलार, पुष्पावती हंडाळ, नितीन जगताप, रेखा राऊत, तेजस्विनी गायकवाड, संदीप राऊत, शैला पितळे, सारिका भोसले, कुसुम गजमल, निलेश कुंभार, लता गायकवाड