नागरिकांचा कल पाहून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली, निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेला दिग्गज नेत्यांना बोलवावे लागण्याची शक्यता

राजकीय

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायतचा प्रचार शिगेला पोहोचला असून नागरिकांचा कल हळू हळू लक्षात येऊ लागल्याने सरपंचपदाच्या उमेदवारांमध्ये मोठी चलबिचल सुरु झाली आहे. आपला निभाव लागणार नाही म्हणून आता काहींनी सरपंचपदाच्या प्रमुख उमेदवारांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे तर काहींनी आता सांगता सभेला आपल्या मोठ्या नेत्यांना बोलवा राव, नाहीतर आपले काही खरे नाही अशी विनवणी पॅनल प्रमुखांकडे करण्यास सुरुवात केली आहे. यातून आता तालुका लेवलचे नेते गावापातळीवरील निवडणूक प्रचारासाठी आले तर नवल वाटायला नको.

पोलखोल विकासकामांची

असे आहेत सरपंच पदाचे उमेदवार आणि त्यांची वर्तमान माहिती

वनिता मनोज (संताजी) शेळके यांची प्रचारात आघाडी, मुद्द्यांना वाढता पाठिंबा… केडगाव येथे सरपंच पदाच्या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये सध्या मोठी चुरस लागल्याचे दिसत आहे. यातील ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या वनिता मनोज (संताजी) शेळके (मा.आमदार रमेश थोरात समर्थक) यांनी प्रचारात चांगलीच मुसंडी मारल्याचे दिसत आहे. दिवसागणिक त्यांना नागरिकांचा पाठिंबा वाढत असताना दिसत आहे. नागरिकांचा वाढता पाठिंबा हा त्यांनी मांडलेले मुद्दे आणि अनेक वर्षांपासून केडगाव ग्रामपंचायतवर एकाच गटाची असलेली सत्ता असल्याचे बोलले जात आहे. वनिता मनोज शेळके यांनी केडगाव येथील पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचार, रस्त्यांची कामे न होने, जे रस्ते झाले त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होऊन निकृष्ट दर्जाची झालेली कामे, निधी उपलब्ध असूनही विकास कामे न करणे, रस्ते आणि इतर विकास कामांमध्ये नागरिकांना वेठीस धरून तोंड पाहून काम करणे या बाबी जनतेसमोर मांडण्यात यशस्वी ठरल्या आहेत. तसेच सत्तेसाठी नव्हे तर लोकसेवेसाठी आपणांस एकदा संधी द्यावी आपण ही सर्व परिस्थिती बदलून टाकू अशी ग्वाही त्या देत आहेत. नागरिक त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिवर्तन करण्याच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे.

विकास कामांच्या जोरावर निवडून येण्याचा विश्वास.. जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या उमेदवार अश्विनी शिवाजी (बंडू) शेळके (कुल समर्थक) याही जोरात प्रचार करत असून त्यांनी या अगोदर पंचायत समिती सदस्यपद भूषविले आहे. त्या विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांना मत मागत असून गेली दहा वर्षे केडगावमध्ये करण्यात आलेल्या विकास कामांच्या जोरावर आपण निवडून येऊ असा विश्वास त्या व्यक्त करत आहेत.

ओपन च्या जागी उभे राहून निवडून येण्यासाठी फॅक्टरवर भिस्त.. सरपंचपदासाठी बाळासो कापरे यांच्या केडगाव विकास आघाडीच्या वतीने सरपंच पदासाठी सौ पूनम गौरव बारावकर या उभ्या असून त्यांना धनगर, माळी व इतर समाजाची मते मिळून त्यांचा विजय होईल असा त्यांना विश्वास आहे. बाळासो कापरे हे थोरात गटातील लोकांबरोबर फिरत असताना त्यांनी अचानक आपला वेगळा पॅनल उभा करून सरपंच पदासाठी सौ बारावकर यांना उमेदवारी दिल्याने मोठी खळबळ माजली होती. बाळासो कापरे यांनी मागील पंचवार्षिकला त्यांच्या उमेदवारांसह सरपंच पदाचे त्यावेळचे उमेदवार अजित शेलार यांचा प्रचार केला होता.