महादेव मंदिरात नारळ नारळ फोडून ग्रामपंचायत निवडणूक प्राचारला सुरुवात, ‘कुल’ गटाच्या प्रश्नांना ‘थोरात’ गटाचे सडेतोड उत्तर

राजकीय

दौंड : केडगाव ता. दौंड येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूने आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. रविवार दि. 29 ऑक्टोबर रोजी कुल गटाने केडगावचे ग्रामदैवत महादेवाला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी कुल गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपण केडगाव पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली असून विकासाच्या मुद्द्यावर आपल्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन केले. राज्य आणि देश पातळीवरील नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास केला असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले. यावेळी काहींनी वयक्तिक टीका करत लोक बाहेरून येऊन येथे राजकारण करत असल्याचे सांगितले. सरपंच पदाच्या उमेदवार अश्विनी शिवाजी शेळके यांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अप्पासाहेब हंडाळ, मनोज होळकर, संदीप गायकवाड, किरण देशमुख, ज्ञानदेव जगताप, शहाजी गायकवाड, बापूराव गायकवाड यांनी या कार्यक्रमात कुल गटाची धुरा सांभाळली. यावेळी थोरात गट त्यांना काय उत्तर देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

थोरात गटाने दिले सडेतोड उत्तर… आज सोमवार दि.30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता थोरात गटाने केडगावचे ग्रामदैवत महादेवाला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. कुल गटाच्या दाव्यांना थोरात गटाने सडेतोड उत्तर देत दाव्यांची पोलखोल केली.

दहा वर्षे सत्ता भोगली तरी अजून सत्तेची भूक भागेना, यांना अजून पाच वर्षे पाहिजेत.. कुल गटाच्या आरोपांना उत्तर देताना विविध वक्त्यांनी आपले म्हणणे मांडले, यामध्ये केडगाव ग्रामपंचायत मध्ये दहा वर्षे सत्ता भोगूनही अजूनही हे पुढील पाच वर्षे मागत आहेत हे लज्जास्पद असून खुद्द केडगाव गावठाणात अजूनही मुख्य रस्ते यांना करता आले नाहीत. महादेव पालखी मार्गाचा रस्ता करण्यास यांना कुणी अडवले होते, नागरिकांनी हा रस्ता व्हावा म्हणून कित्येकवेळा मागणी केली मात्र हे रस्ते काही झाले नाहीत ते आजही तसेच आहेत. हा यांचा विकास म्हणायचा का..? कुटील राजकारण करून यांनी लोकांना दादागिरी केली. गावात येताना निकृष्ट दर्जाची रस्त्याची कामे नजरेस पडतात हा यांचा विकास आहे का असा प्रश्न वक्त्यांनी उपस्थित केला.

सरपंच कुणीही झाला तरी तरी टोळी मात्र तीच, टोळी हद्दपार करण्यासाठी वनिता शेळके यांना निवडून द्या.. सरपंच कुणी झाला तरी ठराविक टोळकेच आपली मनमानी करत असते हे सर्वांना माहित आहे त्यामुळे या टोळक्यांना जनता त्रस्त झाली असून हे टोळके हद्दपार करायचे असेल तर वनिता मनोज शेळके यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन माऊली शेळके, झुंबर गायकवाड यांनी केले. यावेळी झुंबर गायकवाड यांनी गद्दारांना त्यांची जागा दाखविण्याचे आवाहन केले तर सचिन शेळके यांनी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असा घणाघात केला.

भूमी पुत्र मोठा होत असलेला पहावेना, नेते मंडळी पुण्यात राहतात मग त्यांनाही तसेच म्हणणार का..! कुल गटातील वक्त्यांच्या भाषणाचा धागा पकडून थोरात गटाच्या वक्त्यांनी त्यांचे चांगलेच वाभाडे काढले. जे लोक तुम्हाला कायम हीन दर्जाची वागणूक देऊन बदनाम करीत होती ती आता यांना प्रिय झाली आहेत. केडगाव गावातील एक होतकरू तरुण स्वतःच्या कष्टाने मोठा झाला. रिक्षा चालवून आपल्याला कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा तरुण आज आपल्या मेहनतीच्या जोरावर संपूर्ण राज्यात कामे घेऊ लागल्याने काहींच्या पोटात दुखू लागले आहे. तुम्ही गोधडीमध्ये झोपा काढत असताना पहाटे चार वाजता हा तरुण टेस्टीबाईट कंपनीच्या कामगारांना ने आण करण्याच्या दोन-दोन फेऱ्या मारत असायचा हे कष्ट विरोधकांना दिसत नाहीत. फक्त एखाद्याच्या प्रगतीवर जळायचे हाच एक कार्यक्रम यांनी आखला आहे. ज्या तरुणामुळे केडगावकरांची छाती स्वाभिमानाने फुगते त्या तरुणाला त्याच्या कामासाठी शुभेच्छा देण्या ऐवजी त्याच्या मेहनतीवर टीका केली जाते हे दुर्दैवी असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले.

वनिता मनोज शेळके यांना जाहीर पाठिंबा सरपंच पदाच्या उमेदवार वनिता मनोज शेळके यांना सरपंच पदाच्या उमेदवार अंकिता धनंजय शेळके यांनी जाहीर पाठिंबा दिला त्यावेळी धनंजय शेळके यांचा सत्कार करण्यात आला. तसेच धनंजय शेळके यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

सरपंचपदाच्या उमेदवार वनिता संताजी उर्फ मनोज शेळके यांसह त्यांच्या पॅनलला असणाऱ्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन.. यावेळी थोरात गटाकडून सरपंचपदाच्या उमेदवार वनिता मनोज (संताजी) शेळके यांना आणि त्यांच्या सोबत सदस्य पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन उपस्थितांनी केले. या वेळी पंचायत समिती मा. सभापती झुंबरआप्पा गायकवाड, सचिन लालासो शेळके, ज्ञानेश्वर माऊली शेळके यांची भाषणे झाली तर दत्ता शेळके सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी राजेंद्र मलभारे, राजेंद्र शेळके, ज्ञानेश्वर गायकवाड, रोहित गजरमल, संदीप जगताप, दत्ता कडू, संतोष देशमुख, दादा बारवकर, पोपट शेंडगे या प्रमुख कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.