कुटील राजकारणाचे अनेकजण बळी |केडगावच्या राजकारणाची तालुकाभर चर्चा, कार्यकर्ते म्हणतात हा ‘धक्का’ नव्हे ‘धोका’

राजकीय वार्तापत्र | अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील राजकीय पटलावर सर्वात महत्वाचे गाव म्हणून केडगाव ने नावलौकिक मिळविलेला आहे. मात्र केडगावची कालची राजकीय घडामोड पाहता संपूर्ण तालुक्यात या कुटील राजकारणाची छी, थू होताना दिसत आहे आणि यातून सर्वांना एक नवीन धडा शिकायला मिळाला आहे. सत्तेसाठी राजकारण कोणत्या थराला जाते आणि त्यातून काय काय घडू शकते याचा प्रत्यय काल अनेकांना आला आहे.

राजकीय डावपेच आणि सत्तेसाठी धडपड… केडगाव ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहिर होणार हे सर्वांना माहित होते. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्यापरीने तयारी सुरु केली. या प्रक्रियेत प्रत्येकवेळी ‘नेता बदलणारी’ मंडळीही सक्रिय झाली. ही मंडळी सक्रिय झाली की कायम ‘दाया दिखाके बाया मारनेका’ ही रणनीती अवलंबवली जाते हे सर्वश्रुत आहे. निवडणुकीवेळी एखाद्याला सोबत घ्यायचे त्याला शब्द देऊन बळीचा बकरा बनवायचे आणि ऐनवेळी घोळ घालून स्वतःचा स्वार्थ कसा साधला जाईल, सत्ता आपल्या हातात राहून आपलाच फायदा कसा होईल हेच यांचे लक्ष असते हा आजपर्यंतचा इतिहास आहे.

गट सावध झाला पण एकाचा ‘विश्वासघात’ झाला.. कुटील राजकारण करणाऱ्यावर एखाद्याने विश्वास टाकला की मग विश्वास टाकणाऱ्याचा कार्यक्रम केला जातो ही राजकीय मंडळींची ख्याती अनेकांना माहित असूनही काहीजण त्यांच्या बोलण्याला बळी पडत जाऊन त्यांच्या चक्रव्युहामध्ये अडकत जातात आणि त्याचा उहापोह संपूर्ण तालुक्याला पहायला मिळतो जसा काल पहायला मिळाला. गावपातळीवर सरपंच पदाच्या उमेदवारांपासून ते उमेदवारांचे पॅनल करण्यापर्यंत कुटील राजकीय हात खंडे वापरून ऐनवेळी धोका देण्याची आणि विश्वास ठेवणाऱ्यांचाच पॅनल उभा राहणार नाही मात्र स्वतःचा पॅनल तयार ठेवून तो ऐनवेळी उभा करायचा ही पद्धत काल सर्वांनी पाहिली. राजकारणात मातब्बर असणाऱ्या यातील एका कुटील खेळाडूने अगोदर एका गटाचा विश्वास संपादन केला नंतर त्याच गटात दोन गट पाडले, त्यातील एकाला आश्वस्त करून हाताशीही धरले आणि त्यानंतर आपल्या भात्यातील जुनी जातिवंत अस्त्रे बाहेर काढून सर्वांनाच धक्का दिला… मात्र हा ‘धक्का’ नसून ‘धोका’ आहे हे सर्वांना कळून चुकले. मात्र तोपर्यंत काही ठिकाणी याचा फटका बसला आणि दोन ठिकाणी मुख्य सत्ता प्रवाहात असणाऱ्यांचे पॅनेलच टाकले गेले नाही. हाच प्रयोग केडगाव गावात झाला आणि येथेही काही अस्त्रांना ऐनवेळी धार लावून ती चमकविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र यावेळी त्याच्या जुन्या अस्त्रांची माहिती असणाऱ्या काही अनुभवी जानकारांनी अगोदरच येथील गटाला सावध केले असल्याने या ठिकाणी मुख्य प्रवाहात असणारा पॅनल उभा राहू शकला. आणि येथेही मुख्य प्रवाहातील पॅनल उभा न राहू देण्याचा डाव हाणून पाडण्यात यश आले. हे सर्व होत असताना या कुटील खेळाडूचे एक अस्त्र महत्वाच्या ठिकाणचे ‘लक्ष’ भेदण्यात यशस्वी ठरले आणि यात ‘एकाचा’ मात्र विश्वासाचा घात करण्यात ते सफल झाले.

दुसऱ्यांचा राजकीय कार्यक्रम लावणाऱ्याचा राजकारणातून हद्दपारी कार्यक्रम होण्याची शक्यता.. केडगावची राजकीय समीकरणे आता झपाट्याने बदलू लागली असून आता सर्वांनी एकत्र येत अगोदर घर का भेदी ला उघडे पाडण्याचा कार्यक्रम आखला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अगोदर मेळ घालू, नंतर गद्दार बाहेर काढू अशी काहीशी रणनीती आता केडगावमधील एका गटाने आखली असून त्यांच्या या भूमिकेला सर्व स्तरांमधून पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. दोन गटांना एकमेकांत झुलवत ठेवून स्वतःकडे सत्ता खेचायची ही खेळी आता सर्वांच्या लक्षात आली असल्याने यात पुढे काय काय घडामोडी घडतात हे लवकरच समोर येणार आहे.

शब्द एकाला, उमेदवारी दुसऱ्याला.. कालपर्यंत ज्यांना गटाची उमेदवारी तुम्हालाच असे आश्वासन देण्यात येत होते त्यांना ऐनवेळी त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याचे पहायला मिळाले. काहींना नाका पेक्षा मोती जड नको म्हणून त्यांनी ही सर्व खेळी केली असल्याची चर्चाही पंचक्रोशीत होत आहेत.