सांगलीकरांनी अनुभवला आगळा वेगळा ‘हेरिटेज वॉक’, सांगली जिल्हा स्थापना दिवसाचे निमित्त

सुधीर गोखले

सांगली : इतिहासतज्ज्ञ मानसिंग कुमठेकर यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाखाली सांगलीकरांनी खास आपला रविवार हेरिटेज वॉक मध्ये व्यतीत केला. निमित्त होते सांगली जिल्ह्याच्या स्थापना दिवसाचे. गेल्या काही दिवसांपासून या हेरिटेज वॉक बद्दल सोशल मीडियाद्वारे मेसेज व्हायरल झाले होते त्यामुळे सांगली मिरजेतील नागरिकांना या हेरिटेज वॉक बद्दल कुतूहलही होते आणि जाणून घेण्याची जिज्ञासाहि होती.

मिरज चे सुपुत्र असलेले जेष्ठ पत्रकार मानसिंग कुमठेकर यांनी सांगली, मिरजचं नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक खेडी गावे शहरे पालथी घालून तेथील त्या-त्या स्थळांचा इतिहास अगदी कागदपत्रांनिशी अभ्यासला आहे आणि त्याचे ज्ञान ते इतरांनाही देतात. अशाच प्रकारे हा हेरिटेज वॉक सांगली शहरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती सांगण्यासाठी आयोजित केला होता.
सांगलीतील असलेले गणेश दुर्ग, जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील दरबार हॉल सह अनेक स्थळांचे त्यांनी अगदी कागदपत्रासह महत्व सांगितले. यावेळी काँग्रेस कमिटी अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही भाग घेतला.

इतिहास तज्ज्ञ मानसिंग कुमठेकर यांनी आज पर्यंत शेकडो मोडी लिपी शिकवणी वर्ग घेतले आहेत. काहीवेळा जुन्या घरांमध्ये अनेक पुरातन दस्तऐवज आढळून येतात मात्र ते कित्तेक वेळा मोडी लिपी मध्ये असल्याने सध्याच्या परिस्थिती मध्ये त्याचे आकलन होणे मुश्किल असते अशा वेळी मोडी लिपी चे आकलन होण्याच्या उद्देशाने इतिहासतज्ञ कुमठेकर हे मोडी लिपी वर्ग चालवतात.
या ‘हेरिटेज वॉक’ ने सांगली मिरजेतील अनेक नागरिकांना आपल्या शहराचा इतिहास अगदी कागदोपत्री पहाता आला आहे आजपर्यंत मानसिंग कुमठेकरानी अशा कित्तेक हेरिटेज वॉक च्या माध्यमातून सांगली जिल्ह्याचा इतिहास उलगडून दाखवला आहे.