अब्बास शेख
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दि.16 ऑक्टोबर 2023 पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 20 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणुक उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अर्ज भरताना मोठ्या तांत्रिक अडचणी येत आहेत. विविध जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
अशीच काहीशी परिस्थिती पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातही पहायला मिळत आहे. दौंड तालुक्यात विविध ठिकाणी असणाऱ्या ई सेवा केंद्र, सेतू केंद्र, नेट कॅफेवर इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे. कालचा दीड दिवस फक्त या तांत्रिक अडचणींचा सामना करण्यातच गेला आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांमधून केली जात आहे. दौंड तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु सर्व्हर डाऊन असल्याने अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत. उत्सुक उमेदवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तारीख वाढवून द्यावी आणि उमेदवारी अर्ज ऑफ लाईन घ्यावे अशी मागणी करत आहेत.
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांकडून मोठी गर्दी केली जात आहे. मात्र ऑनलाईन प्रक्रिया करत असताना मोठी दमछाक होताना दिसतेय. वेबसाईट सर्व्हर वारंवार डाउन होत असल्याने एक फॉर्म भरण्यासाठी मोठा वेळ लागत आहे. फॉर्म भरला तर सबमिट होत नाही त्यामुळे तहसील ऑफिसला जाऊन उमेदवारी अर्ज प्रक्रिया पुढे सबमिट करण्यास उमेदवारांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. अर्ज भरण्याची 20 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे, त्यामुळे उमेदवार धास्तावले आहेत.
बापू नवले | सनराईज कॉम्पुटर केडगाव. ता. दौंड
ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरताना तांत्रिक भिगाड होण्याच्या तक्रारी येत आहेत. सर्व्हरवर लोड येत असल्याने ही अडचण येत आहे. उमेदवारांना येणारी अडचण राज्य निवडणूक आयोगाच्या टेक्निकल टीमला कळवली आहे त्यामुळे ही तांत्रिक अडचण दूर होण्याची शक्यता आहे. ऑफलाईन फॉर्म भरण्याबाबत सध्यातरी कोणतेही निर्देश नाहीत. ऐनवेळी जर शासनाकडून तसा काही आदेश आला तर तोही आपल्याला मध्यमातून प्रसारित करण्यात येईल.
अरुणकुमार शेलार | तहसीलदार, दौंड