अख्तर काझी
दौंड : पुण्यातील ससून रुग्णालय परिसरातून तस्करांकडून कोट्यावधी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आल्यानंतर सर्वच पोलीस दल अलर्ट झाले आहेत. शहरातील बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांवर करडी नजर ठेवली जात आहे. त्या ठिकाणी संशयास्पद हालचाल असणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी करण्याचे सत्र पोलिसांनी सुरू केले आहे. त्याच अनुषंगाने दौंड रेल्वे सुरक्षा बल पोलीस पथकाने कोणार्क एक्सप्रेस ने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल 44 किलो गांजा हस्तगत केला असल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.14 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 वा दरम्यान कोणार्क-मुंबई एक्सप्रेस गाडीतून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडे रेल्वे सुरक्षा बल (आर.पी.एफ) पोलिसांची नजर गेली, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने आर.पी.एफ. पोलिसांना त्याचा संशय आला. म्हणून त्यांनी त्या प्रवाशाची, सामानाची झडती घेतली असता त्याच्याकडे असणाऱ्या बॅगेत 22 किलो गांजा सापडला. त्या ठिकाणची कसून झडती घेतली गेली तेव्हा त्या प्रवाशाच्या सीट खाली आणखीन एक 22 किलो गांजा असलेले बंडल सापडले.
त्यामुळे लागलीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अमित सीमांचला शेट्टी (वय 23,रा. कुडामारी, पेंडुराखारी,ता. पाटापुर, ओरिसा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती आर.पी.एफ चे पोलीस निरीक्षक वि.के. सोलंकी व पो. उपनिरीक्षक राकेश कुमार यांनी दिली. सदरची कारवाई सहाय्यक उपनिरीक्षक डी. टी. राऊत, पो. क. नागराज कांबळे, एम.एम. आडकर या पथकाने केली.