मुंबई : लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीमध्ये विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या अचूक व अद्ययावत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या.
पुढच्या वर्षी म्हणजे २०२४ साली लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणूका कोणत्या महिन्यात होतील हे अजून निश्चित नसले तरी निवडणूक आयोगाची तयारी पाहता त्या लवकरात लवकर घेण्यात येतील असे संकेत मिळत आहेत.
संपूर्ण देशात लोकसभा निवडणुका होत असताना काही राज्यातील विधानसभा, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही लोकसभा निवडणुकी नंतर लगेच येणार आहेत. त्यामुळे या सर्व निवडणुका एकत्र घेतल्या जातील की वेगवेगळ्या घेतल्या जातील याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. वन नेशन, वन इलेक्शन हे ब्रीद येथे वापरले जाणार का याबाबतही तर्क लावले जात आहेत.