‘शिविमुक्त कट्टा’, ‘त्या’ बॅनर ची सर्वत्र चर्चा

सुधीर गोखले

सांगली : अलीकडील काळात लहानग्यांपासून मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाच्या तोंडातून काही ना काही कारणाने ‘शिवी’ हि उच्चारली जातेच. त्यात विशेष करून सांगली, कोल्हापूर, सातारा या भागात तर हमखास ‘शिव्या’ शिवाय चैन पडत नाही.

काही ना काही कारणास्तव समोरच्या व्यक्तीला अगदी रांगड्या भाषेत शिवी हासडून त्याचा उद्धारच केला जातो मात्र सांगली मध्ये मस्जिद ए नमराह या संस्थेने या सगळ्या प्रकाराला वैतागून अतिशय चांगल्या आशयाचा डिजिटल फलकच प्रदर्शित केला आहे. आणि या फलकावर नामकरण सुद्धा ‘शिविमुक्त कट्टा’ असे केले आहे. साधारण एखाद्या कट्ट्यावर चार टाळकी जमली कि एकमेकांचा उद्धार सुरु होतो मग आपोआप तोंडातून समोरच्याला शिव्यांची लाखोली वाहिली जाते मात्र हे बॅनर सध्या सर्वत्र कुतूहलाचा विषय बनले आहे.

या बॅनरवर आई चे महत्व सांगितले आहे आई प्रचंड वेदना सहन करून बाळाला जन्म देते खूप कष्ट करून त्याचे संगोपन करते. त्यामुळे तिच्याबद्दल आपल्याला आदर हवाच त्यामुळे तिच्यावरून आपण शिवी का द्यावी असा आशय या बॅनर वर पहायला मिळतो. आणि आई बहिणीवरून शिवी न देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन देखील या बॅनरवर या संस्थेने केले आहे. सध्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.