Need Remdesivir Injection – रेमडीसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्याने दौंड तालुक्याची परिस्थिती बनली बिकट! कोविड रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरहि हताश



| सहकारनामा |


दौंड : दौंड तालुक्यातील कोविड 19 (कोरोना) रुग्णांची परिस्थिती अगोदरच  बिकट बनत चालली आहे.अनेक रुग्णालयात व्हेेंटीलेटर बेड, ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाहीयेत आणि त्यातच दुःकाळात 13 वा महिना म्हणतात तसे आता कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडीसीवीर या इंजेक्शनचा (Need Remdesivir Injection) मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवू लागला आहे. 

सध्या दौंड तालुक्यातील कोविड (कोरोना) रुग्णांवर उपचार करणारे जवळपास सर्वच दवाखाने ओव्हर फुल झाले आहेत. यातील सर्वच कोरोना बाधित रुग्णांना संजीवनी ठरणारे रेमडीसीवीर इंजेक्शनची (Remdesivir Injection) गरज भासत असल्याने त्याची मागणी वाढत चालली आहे आणि पर्यायाने त्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. रेमडीसीवीर या इंजेक्शनची गरज ओळखून सरकारने त्याची किंमतही सर्वांना परवडेल या कक्षेत आणली आहे मात्र त्याचा हवा तसा पुरवठा होत नसल्याने अनेक कोरोना रुग्ण उपचाराविना दगावत असल्याचे खाजगी डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

रेमडीसीवीर या इंजेक्शनची दौंड तालुक्यासाठी असणारी गरज लक्षात घेऊन या तालुक्यात जास्त प्रमाणावर रेमडीसीवीर इंजेक्शनचा पुरवठा होणे हि काळाची गरज बनली आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच रुग्णालये फुल झाली असल्याने आणि वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता हे इंजेक्शन प्रत्येक दवाखान्यात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्याची गरज आहे.



आमदार राहुल कुल यांचीही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..

दौंडचे आमदार राहुल कुल यांनी रेमडीसीवीर इंजेक्शनची तालुक्याला असणारी गरज ओळखून पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन दौंड तालुक्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावासंदर्भात चर्चा केली आणि डेडीकेटेड कोव्हीड रुग्णालयांशी समन्वय साधून ऑक्सिजन व रेमिडीसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करावी तसेच ऑक्सिजन , व्हेंटिलेटर बेड्सची संख्या वाढवावी अशी मागणी केली.