एकदा थांबला, कायमचा संपला | गाव पुढाऱ्यांच्या लबाडीने ‘होतकरू’ तरुण राजकारणापासून दूर, यावेळी मात्र ते शक्य नाही

राजकीय – अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आणि सर्वत्र गाढ झोपेत गेलेले गाव पुढारी अचानक जागे झाले. गावातील काठावर असणारे तरुण हेरून ‘एका गाडीवर तीन’ असा सालाबाद प्रमाणे ढाबा, हॉटेल प्लॅन करून 15 दिवसीय खाव, खुजाव, बत्ती बुजाव असा कार्यक्रम काही ठिकाणी सुरुही झाला आहे. कारण जर हालचाल सुरु केली नाही तर हातचं सुद्धा जाण्याची भीती यांना वाटत राहते.

यावेळी थांब, पुढे विचार करू… राजकारणात येण्याची अनेक वर्षांपासून होतकरू तरुणांची इच्छा राहिली आहे मात्र या तरुणांच्या इच्छांवर गाव पुढारी कायम पाणी फिरवत आले असल्याचे चित्र पहायला मिळत आले आहे. आता नको, नंतर विचार करू, पुढच्यावेळी नक्की असा शब्द देतो हे जुने फासे आजही गाव पुढऱ्यांच्या कामी येतात हे विशेष. एकदा का त्या तरुणाने उमेदवारी माघारी घेतली की मग पुन्हा आयुष्यात तो कधी राजकारणात दिसत नाही. कारण त्याला पुढे कुठेच वाव दिला जात नाही आणि राजकारणातून, लोकांमधून त्याला कसे संपवले जाईल याचा प्रयत्न गाव पुढारी मनापासून करत असतात मात्र त्यांच्या या कूट नितीला जो भाळत नाही तो मात्र पुढे चांगली कामगिरी करतो असा अनुभव जाणकार लोक सांगतात. राजकारणात आपलीच मक्तेदारी रहावी म्हणून साम, दाम, दंड, भेद चा वापर करून ही मंडळी मुंगळ्यासारखी सत्तेच्या ढेपेला चिकटून बसल्याचे पहायला मिळते. याहीवेळी असेच होताना दिसत असून अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांना खाली बसवून आपल्याला मर्जीतील उमेदवार देण्याचा प्रयत्न हे गाव पुढारी करताना दिसत आहेत.

मॅनेज करायचा, नाही झाला तर नेत्यांकडे घेऊन जायचा | कूट रणनीतीचा यावेळीही तसाच वापर… निवडणुकी पुरते गोड बोलणारे, पाया पडणारे आणि निवडून आले की जनतेची थट्टा करणारे, कायम अडवणूक करणारे, लोकांना हेलपाटे मारायला लावणारे आणि गाव विकास निधीमध्ये स्व निधी शोधणारे गाव पुढारी याहीवेळी नाराज इच्छुक, तरुण आणि युवकांवर तीच रणनीती अजमावताना दिसत आहेत. जो जसा मॅनेज करता येईल तसा करायचा, कार्यकर्ता आपल्याला दाद देत नसेल तर नेत्यांच्या आणाभाका द्यायच्या. नेते तुमची आठवण काढत होते, एकदा भेटायला जाऊ असे म्हणत पाच वर्षातून एकदा खांद्यावर हात ठेवण्यासाठी नेत्यांकडे घेऊन जायचे आणि नाराजी दूर करून मोठा तिर मारला या अविर्भावात घरी यायचे असा हा काहीसा ठरलेला कार्यक्रम. एकदा नाराजी दूर झाली आणि निवडणुकीचे काम फत्ते झाले की पुन्हा थेट पुढची पंचवार्षिक…

मर्जीतील माणसे शोधून सत्ता हातात घेण्यावर भर… सत्ता हातात आली की गावच्या विकासासाठी मंजूर झालेले निधी मन मर्जिप्रमाणे कुठेही वापरून आर्थिकरित्या मजबूत झालेले महाभाग पुन्हा एकदा सत्ताधीश होण्याच्या दिशेने वाटचाल करू पाहत आहेत.
निवडणुकीला इच्छुक असणाऱ्या सुशिक्षित तरुणांच्या आशा आकांक्षावर हे गाव पुढारी पुन्हा एकदा पाणी फेरताना दिसत असून निवडून येणारा माणूस जर ताटा खालचे मांजर नसेल तर मग आपल्याला किंमत काय राहणार या एका धास्तीने विचारात मग्न नेते रात्रीचे 4 कधी वाजतात हेच त्यांना समजत नाही.

यावेळी मात्र परिस्थिती वेगळी असणार… त्यामुळे उमेदवारी कुणाला या पेक्षा जो आपले ऐकेल त्यालाच जवळ करायचे अशी काहीशी रणनीती या स्वयंघोषित पुढऱ्यांकडून अंगीकारली जाते. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक पक्षात, गटात, दोन-तीन गट पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे मतदारांकडून ‘गट’ आणि ‘पक्ष’ या पेक्षा ‘व्यक्ती’ कोण यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. गटा-तटांनी गावचे वाटोळे केले त्यामुळे कोण कोणत्या पक्षात जातो, कुणाचा पक्ष मजबूत होतो यापेक्षा यावेळी गट-तट न पाहता जनता व्यक्ती पाहणार आहे. त्यामुळे ज्यांना तळमळ आहे, ज्यांचा राजकारणात गाढा अभ्यास आहे, जे काहीतरी करू इच्छितात मात्र सत्ता नसल्याने असफल राहिले अश्या उमेदवाराच्या हातात जनता सत्तेच्या चाव्या देईल अशी माहिती थेट नागरिकांच्या चर्चेतून पुढे येत आहे.