दौंड तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा उत्साहात संपन्न

अख्तर काझी

दौंड : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच जिल्हा क्रीडा परिषद, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि शेठ जोतिप्रसाद विद्यालय दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा नुकत्याच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ च्या मैदानावर संपन्न झाल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन रोटरी क्लब दौंडच्या अध्यक्षा सविता भोर व दौंडचे भूषण राष्ट्रीय ॲथलेटिक्स खेळाडू प्रणव गुरव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शेठ जोतिप्रसाद विद्यालयाचे संस्था प्रतिनिधी योगेश कटारिया, प्राचार्य ज्ञानदेव लोणकर सर, पर्यवेक्षक नवनाथ कदम , प्रमोद काकडे , मा. नगरसेवक अनिल साळवे, मिशन हायस्कूल बारामतीचे मा. प्राचार्य प्रवीण साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाचच्या समादेशक विनिता साहू व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याचबरोबर तालुक्यातील विविध शाळामधून आलेल्या क्रीडा शिक्षकांच्या स्नेहभोजन व खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सन्मानचिन्ह यासाठी योगेश चापोरकर, सुनील शिंदे, प्रल्हाद जाधव, माही स्पोर्ट्स चे विकी चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.

या स्पर्धेमध्ये तालुक्यातील ६५ शाळांमधील १४ वर्षे, १७ वर्षे, १९ वर्षे वयोगटातील ९८० मुले व मुलींनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त गुणांच्या आधारे गटनिहाय सर्वसाधारण वैयक्तिक ट्रॉफी मिळविणारे खेळाडू पुढील प्रमाणे : १४ वर्षे वयोगट – मुले :आदित्य संतोष शिंदे.कैलास विद्यामंदिर राहू, मुली: स्नेहल सोमनाथ होगले. संत तुकडोजी विद्यालय दौंड. १७ वर्षे वयोगट:मुले : भूषण अशोक जगताप. संत तुकडोजी विद्यालय दौंड, मुली: साक्षी बापू झेंडे. नवीन माध्यमिक विद्यालय मळद. १९ वर्षे वयोगट: – मुले: यश दत्तात्रय निकम. शेट जोतिप्रसाद विद्यालय दौंड, मुली : सुमन ज्ञानदेव ढेबे. श्रीयोग माध्यमिक विद्यालय बेटवाडी. संपूर्ण स्पर्धेमधील गुणांच्या आधारे सर्वसाधारण विजेतेपद मुलांच्या गटांमध्ये सेंट सॅबेस्टियन विद्यालय दौंडने तर मुलींच्या गटामध्ये कैलास विद्या मंदिर राहूने पटकावले. या स्पर्धेमध्ये उत्तम जावळे, सुनील माने, राजेंद्र साळवे, प्रवीण होले,संतोष सोनवणे, दुर्योधन जठार, विशाल पवार, सुनील पवार व इतर क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून काम पाहिले.

या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन क्रीडा शिक्षक उमेश पलंगे, उत्तम आटोळे, फारुख शेख, दौंड फुटबॉल अकॅडमी, महेश हुल्लेकर, नामदेव खडके या क्रीडा शिक्षकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैभव पाटील यांनी केले.