काय सांगता! 600 रुपयांत कोरोनाचा ‛निगेटिव्ह’ रिपोर्ट हातात! पोलिसांकडून दोघांना बेड्या तर 28 बोगस रिपोर्ट जप्त



| सहकारनामा |


पुणे

सध्या राज्यामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. जिकडे तिकडे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे राज्यसरकारनेही कडक निर्बंध जारी केले आहेत आणि सोबतच हा राज्यातून त्या राज्यात प्रवास करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे ज्यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना त्यांचा कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु काही महाभागांनी आता या आजारातही आपले काळे धंदे सुरूच ठेवले असून कोरोनाला संधी समजून नको ते उद्योग सुरू केले आहेत.

असाच बनावटगिरीचा प्रकार पुण्यात उघडकीस आणण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले असून त्यांनी पुणे आणि  पिंपरी-चिंचवड मधून अन्य राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना करोनाचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून देणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. 

या टोळीकडुन करोनाचे 28 निगेटिव्ह रिपोर्ट हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी अजून दोन जण फरार असून त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी बनावट रिपोर्ट तयार केल्याप्रकरणी पत्ताराम केसराम देवासी आणि राकेशकुमार बस्तीराम वैष्णव यांना अटक केली आहे तर आणखीन दोघांचा शोध सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे, पिंपरी-चिंचवड मधून राजस्थानला जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना कोरोनाचा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट अवघ्या 500 ते 600 रुपयांना दिला जात असल्याची माहिती हिंजवडी पोलीस स्टेशन चे काटे यांना मिळाली होती. 

यावेळी त्यांनी अधिक चौकशी केली असता यातील दोन आरोपी हे ट्रॅव्हल्समध्ये परराज्यातील प्रवाशी बसवून देताना त्यांना लागणारा कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट केवळ 500 ते 600 रुपयांना बनवून देत असल्याचे तपास करताना आढळले. आरोपींनी हे रिपोर्ट बावधन येथील लाईफनीटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड येथील असल्याचे आणि त्या निगेटिव्ह रिपोर्टवरून इतर डॉक्टरांच्या बनावट सह्या करून रिपोर्ट बनवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हि कामगिरी हिंजवडी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके हे करत आहेत.