अब्बास शेख
ग्रामपंचायत निवडणूक विशेष : दौंड तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. दौंड तालुक्यातील महत्वाच्या ग्रामपंचायतींपैकी केडगाव ही एक ग्रामपंचायत आहे. सरपंच पदासाठी या सर्वसाधारण महिला (Open) आरक्षण असल्याने येथील विविध पक्ष, गट आपापल्या परीने मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत. मात्र यावेळी दोन्ही गटातील नाराज तरुणांचा सामना दोन्ही गटांच्या गाव पुढाऱ्यांचा करावा लागणार असे एकंदरीत दिसत आहे.
‘सरपंच’ पदासाठी कुल-थोरात गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरु
ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच महिला सरपंच उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे. सरपंच उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरु असलेल्यांमध्ये कुल-थोरात यांसह नाराजांच्या तिसऱ्या आघाडीचाही समावेश आहे. कुल आणि थोरात गटामध्ये सरपंच पदाची उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत मोठी चर्चा रंगत असताना दिसत आहे. दोन्ही गट ‘शेळके’ आडनावाचे उमेदवार देण्यासाठी सल्लामसलत करत असल्याचे दिसत आहे. मात्र यामध्ये ऐनवेळी ट्विस्ट येऊन दुसऱ्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
कुल-थोरात गटाला बंडखोरीचा सामना करावा लागणार..! विश्वासात घ्या, उमेदवारी द्या, अन्यथा बंडखोरी अटळ असल्याचा निर्वानीचा ईशारा काही इच्छुक उमेदवार देताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे इमान इतबारे पक्षांचे काम करायचे. दिवसरात्र पक्षांसाठी, गटासाठी झगडायचे आणि भाव मात्र गाव पुढाऱ्यांनी खाऊन जायचे अशी काहीशी परिस्थिती या ठिकाणी राहिली आहे. आम्हाला जो आवडेल आणि आम्ही म्हणू तोच उमेदवार असा काहीसा प्रत्यय प्रत्येक पंच वार्षिकला कार्यकर्त्यांना येत राहिला आहे. सरपंच, सदस्य कुणीही होवो ग्रामपंचायतचा कारभार मात्र आम्हीच पाहणार असा अनुभवही अनेकांना आल्याचे ते खाजगीत बोलून दाखवतात. त्यामुळे या सर्व जुन्या खोडांना बाजूला करून नविन उमेदीच्या तरुणांना संधी मिळावी अशी इच्छा अनेकांची आहे. त्यामुळे या इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करण्यासाठी दोन्ही गटांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
‘सहा’ वार्डमध्ये ‘तीन’ वार्ड बंडखोरीच्या उंबरठ्यावर… केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सहा वार्डपैकी तीन वार्डमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये केडगाव गावठाण, धुमळीचा मळा आणि देशमुख मळा या तीन वार्डचा प्रामुख्याने समावेश आहे. या तीन वार्डमध्ये कुल-थोरात गटाकडून ग्रामपंचायत सदस्यपदासाठी अनेक उमेदवार निवडणूक लढविण्यास इच्छुक असून उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी करण्याचा ईशारा त्यांच्याकडून दिला जात आहे. ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होताच अनेकांनी निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर केली आहे. कुणी सोशल मिडियावर तर कुणी चार चौघांमध्ये ही इच्छा बोलून दाखवत आहेत.
वयक्तिक गाठीभेटींवर भर, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पाच वर्षे ज्यांकडे ढुंकूनही पाहिले नाही अश्या नाराज नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी घेण्याचे सत्र सुरु झाले आहे. निवडणूक जवळ आली की कार्यकर्त्यांना, नाराज लोकांना भेटायचे, जेवायला घेऊन जायचे, गोड गोड बोलायचे अण जुने झाले गेले विसरून जा असे म्हणायचे, वेळ पडली तर सॉरी आणि दिलगिरीने काम चालवायचे ही गाव पुढऱ्यांची एक जुनी पद्धत आहे. ही पद्धत मात्र आता नविन दमाचे करायकर्ते आणि नागरिक पुरते ओळखून आहेत. त्यामुळे अश्या गाव पुढऱ्यांपासून सध्या दोन हात लांब राहत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि जुने कार्यकर्ते हे गाव पुढाऱ्यांच्या जेवण आणि इतर आमिशांना बळी पडतील असे सध्यातरी दिसत नाही.