अख्तर काझी
दौंड : शहरामध्ये भटक्या, मोकाट कुत्र्यांनी धूडगूस घातला असून, त्यांच्या नागरिकांवरील होणाऱ्या हल्ल्यांमुळे दौंडकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याची बातमी ‘सहकारनामा’ ने प्रकाशित केल्यानंतर, शहरातून या भटक्या कुत्र्यांच्या आणखीकाही धक्कादायक घटना नागरिकांनी ‘सहकारनामा’ प्रतिनिधिंना संपर्क करून सांगितल्या आहेत.
थेट म्हशीच्या पिल्लावर हल्ला आणि फडशा.. भीम नगर परिसरात राहणाऱ्या एका गवळी कुटुंबाकडील म्हशीच्या दोन दिवसाच्या पिल्लावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्या म्हशीच्या पिल्लाला खाऊन टाकल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत, दौंड गोपाळवाडी रोड परिसरातील सोसायटीमध्ये राहणारे मा. मुख्याध्यापक चालत जात असताना या भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांच्या अंगावर धावत गेली यावेळी कुत्र्यांपासून आपला बचाव करताना ते रस्त्यावर पडले. या घटनेमुळे दहा दिवस झाले ते अंथरुणावर पडून आहेत. अशा अनेक घटना शहरातील या भटक्या कुत्र्यांमुळे रोजच घडत आहेत. त्यामुळे या मोकाट व भटक्या कुत्र्यांचे कोणीतरी, काहीतरी करा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे दौंड रुग्णालयात दर महिल्याला 300 जण घेत आहेत उपचार… भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले रुग्ण येथील उपजिल्हा रुग्णालयात किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. अशा जखमी रुग्णांबाबतची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना विचारली असता ते म्हणाले की, भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेले किमान 300 रुग्ण दर महिन्याला आमच्या दवाखान्यात उपचारासाठी येत आहेत व आम्ही त्यांच्यावर उपचार करीत आहोत, कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. त्यामुळे हा विषय सर्वांनीच गांभीर्याने घेतला पाहिजे व दौंड नगरपरिषदेने या कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे असे डॉक्टरांकडूनही सुचविण्यात येत आहे.
दौंड नगरपरिषदेच्या एजन्सीने नऊ महिन्यात 200 कुत्री पकडली… शहरातील भटक्या कुत्र्यांच्या घटनांबाबत दौंड नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शाहू पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, मागील नऊ महिन्यांपासून शहरातील मोकाट कुत्री पकडण्याचे काम नगरपरिषदेने माहेरा इंटरप्राईजेस यांना दिलेले आहे. या कालावधीत त्यांनी अंदाजे 200 मोकाट कुत्री पकडली आहेत. ती कुत्री पुन्हा शहरात येणार नाहीत अशा निर्जन स्थळी त्यांना सोडण्यात आले आहे. या पकडलेल्या कुत्र्यांची नसबंदी करणे गरजेचे असते परंतु ते खर्चिक असल्याने व तो खर्च नगरपालिकेला परवडणारा नाही, म्हणून या कुत्र्यांची नसबंदी न करताच त्यांना सोडून देण्यात येत आहे.
दौंड शहरातील ज्या परिसरामध्ये पिसाळलेली कुत्री किंवा आक्रमक होऊन लोकांना चावणारी कुत्री जर कोणाला आढळली तर त्यांनी नगरपालिकेशी संपर्क साधून त्या परिसराची माहिती द्यावी असे आवाहन दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले यांनी केले आहे.