| सहकारनामा | अब्बास शेख |
दौंड : आपल्याला कोरोना झाला म्हणजे आता सर्व संपले असे मानणे किंवा मनात आणणे हे साफ चुकीचे असून लोकांनी काळजी जरूर घ्यावी मात्र अजिबात घाबरू नये, तसेच मिडियानेही फक्त कोरोना चे वाढलेले आकडे आणि मृत्यूदर दाखविण्यापेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचीही आकडेवारी आणि सकारात्मक बातम्या जरूर दाखवाव्यात असे मत भीमा पाटस कारखान्याचे उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी व्यक्त केले आहे.
सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण राज्य चिंतेत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत मात्र यासाठी लोकांनी स्वतः होऊन आता शासनाने घालून दिलेले नियम पाळले पाहिजे तरच हि महामारी आटोक्यात येईल आणि लोकांची यातून सुटका होईल.
यासाठी लोकांनी डॉक्टरांनी दिलेले नियम अवश्य पाळावेत जसे.. मास्क परिधान करावे, सोशल डिस्टनसिंग चे पालन करावे, गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, गरम पाण्याची वाफ घेत रहावी, हात साबण आणि सॅनिटायजर ने स्वच्छ करावेत आणि कोरोना संदर्भात कुठलेही लक्षण दिसले तर त्वरित रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
मीडियाने आपली जबाबदारी पार पाडताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा…
सध्या टीव्हीवर कोणतेही न्यूच चॅनेल लावले की कोरोनाचे वाढलेले आकडे, कोरोनामुळे झालेले मृत्यू हेच जास्त दाखविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाबाबत कमालीची भीती निर्माण झाली असून एखाद्याला कोरोना झाला की त्याला साक्षात मृत्यूच दिसू लागतो आणि त्याचे मनोधैर्य खच्ची होऊन तो बरा होण्याऐवजी अजून जास्त आजारी पडत जातो अशी सध्याची एकंदरीत परिस्थिती दिसत आहे.
यासाठी न्यूज चॅनेल, वृत्तपत्र आणि न्यूज पोर्टल ने सकारात्मक बातम्याही दाखवून कोरोनातून बरे झालेल्यांचे आकडे आणि कमी झालेला मृत्यू दरही समोर आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.