दौंड : दौंड तालुक्यात डीपी, विद्युत ट्रान्सफार्मर फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा यवत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी सुमारे 8 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १७/०२/ २०२१ रोजी बोरिभडक (तालुका दौंड, जिल्हा पुणे) येथील मोठा कॅनलच्या कडेला असणारी ट्रान्सफॉर्मर डीपी खाली पाडून त्यातील दीडशे किलो वजनाच्या तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या.
या बाबत यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा उघडकीस आणून एकूण ६४ हजार ४००/- रुपये किमतीचा तांब्याच्या तारा जप्त करून आठ आरोपींना अटक करून त्यांच्याकडे यवत पोलीस स्टेशन हद्दीमधील तीन गुन्हे उघडकीस आणल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.
पुणे ग्रामीण जिल्ह्यात ट्रांसफार्मर डीपी चोरीचे गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणणे कामी आदेश केले होते. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रमेश कदम, संदीप कदम, निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, महेंद्र चांदणे, निखिल रणदिवे, मारुती बाराते, रामदास जगताप, प्रमोद शिंदे यांचे पथक तयार केले होते.
सदरच्या पथकाने ट्रांसफार्मर डीपी चोरी करणारे रेकॉर्डवरील आरोपी चेक करून माहिती संकलित करण्यात आली होती. दरम्यान रांजणगाव पोलीस स्टेशन यांनी ट्रान्सफॉर्मर डीपी चोरी करणारी टोळी जेरबंद केल्याचे समजलेने सदर ट्रान्सफॉर्मर डीपी चोरी करणाऱ्या टोळीला पोलीसांनी तपास कामी ताब्यात घेतले असता सदर टोळीने यवत पोलीस स्टेशन हद्दीत मौजे बोरीभडक, राहू परिसरात ट्रांसफार्मर डीपी चोरी केल्याचे सांगितले.
यामध्ये आरोपी १) सचिन उर्फ गुलट्या सुभाष काळे (वय-२१),२) आकाश उर्फ गोट्या सुभाष काळे (वय-१९ गणेगाव खालसा तालुका शिरूर जिल्हा पुणे) ३) साहिल उर्फ नटया शैलेश सुधाकर भोसले (वय-२० रा. वाखरी तालुका फलटण जि.सातारा) ४) उमेश बलीचरण यादव (वय-१९ ,५) गोविंद हनुमान यादव (वय-२१), ६) करिमुल्ला आतिउल्ला मनियार (वय-२२,) ७) घरभरण औंधाराम यादव (वय-३६,) ८) आकरम यासीन रगरेंज (वय-५० सर्व रा. उत्तर प्रदेश सध्या रा. रांजणगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे) या 8 जणांना यवत पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून बोरीभडक, राहु, परिसरातील डीपी ट्रान्सफार्मर चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
मा.सेशन कोर्ट बारामती यांनी आरोपींना ०१/१०/२०२१ पर्यत पोलीस कस्टडी रिमांड दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार रमेश कदम हे करीत आहेत. आरोपींकडून आणखीन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.