पैगंबर जयंती निमित्त दौंडमध्ये ‘रक्तदान’ शिबिर संपन्न, सर्व धर्मिय युवकांचा शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

अख्तर काझी

दौंड : प्रेषित हजरत मो. पैगंबर (सल्ल.) जयंती निमित्ताने येथील चांदभाई शेख मित्र परिवार, एस. आर. बॉईज, एम. के. ग्रुप च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शाही आलमगीर मशिदीचे विश्वस्त अनिस इनामदार, मा. नगराध्यक्ष बादशाह शेख, मा. नगरसेवक बबलू कांबळे, राजेश जाधव, शहानवाज पठाण शिवसेनेचे शहराध्यक्ष आनंद पळसे, एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष मतीन शेख, इसामुद्दिन मन्यार, अझहर शेख, गणेश आल्हाट, सागर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिरास येथील सर्वच समाजातील युवकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. 50 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. शिवशंभो रक्तपेढीने रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडली. चांद शेख, मोहन कांबळे, शरीफ सय्यद, रफिक शेख, साजिद बागवान, शाहरुख शेख, झीशान अतार, चांद शेख, सुशांत कंपलीकर यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

दि.29 सप्टेंबर रोजी येथील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने पैगंबर जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंतीनिमित्ताने शहरातील विविध मंडळातर्फे सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मुस्लिम बांधवांच्या वतीने शहरातील प्रमुख चौकातून मिरवणुकीचे (जुलूस) आयोजन करण्यात आले आहे. येथील शाही आलमगीर मशीद येथे मिरवणुकीची सांगता करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.