अख्तर काझी
दौंड : लाडक्या गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत झाल्यानंतर शहरातील विविध गणेश मंडळांनी दौंडकरांसाठी चांगले देखावे सादर केले आहेत. सामाजिक संदेश देणारे देखावे मंडळांनी सादर करावेत असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील कुरकुंभ मोरी परिसरातील झुंज मित्र मंडळाने अप्रतिम असा सामाजिक (विशेषतः सध्याच्या युवा पिढीला) संदेश देणारा देखावा सादर केला आहे.
या मंडळाने काल्पनिक येरवडा कारागृह देखावा सादर करून गुन्हेगार बनल्यानंतर त्यांचे आयुष्य कसे असते व त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा त्यांच्या कुटुंबाला आणि स्वतःला किती त्रास व अपमान सहन करावा लागतो, गुन्हेगारीमुळे आयुष्याचे कसे नुकसान होते हा जिवंत देखावा सादर केला आहे. गुन्हेगारी विश्व किती वाईट आहे व त्यापासून युवा पिढीने का व कसे लांब राहिले पाहिजे याचा संदेश देखाव्यातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गुन्हा करणे सोपे असते मात्र त्यानंतरचा आरोपी म्हणूनचा जो कठीण प्रवास (अटक ,जामीन, सजा) त्यांना करावा लागतो तो प्रवास गुन्हेगाराला व त्यांच्या कुटुंबीयांना किती त्रासदायक ठरतो ते या देखाव्यातून दाखविण्यात आले आहे.
देखाव्याचे उद्घाटन दौंड चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रुपेश कटारिया, दौंड पो. स्टे.चे पो. कर्मचारी पांडुरंग थोरात, अमोल देवकाते आदी उपस्थित होते. देखाव्याच्या संकल्पनेची भाऊसाहेब पाटील यांनी प्रशंसा केली व भाई बनण्याची मनीषा बाळगणाऱ्या प्रत्येक युवकाने हा देखावा पहावा व या देखाव्यातून शहरातील युवावर्गाने काहीतरी शिकवण घ्यावी, तसेच गुन्हेगारी क्षेत्रापासून युवकांनी चार हात दूर राहावे असे आवाहन यावेळी भाऊसाहेब पाटील यांनी केले.